देहु गावातील रहिवासी, गुडघेदुखीच्या त्रासाने डेक्कन जिमखान्यावरील हॉटेलमध्ये संपविले जीवन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : देहु येथील रहिवासी आणि सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील पोलीस उपनिरीक्षकाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.
पोलीस उपनिरीक्षक सुरज मराठे (वय २६) असे त्यांचे नाव आहे. पोलीस सेवेत भरती होऊन त्यांना दोन वर्षे झाली होती. ते अविवाहित होते. सुरज मराठे हे मूळचे पुणे जिल्ह्यातील देहु येथील रहिवासी होते.
प्रशिक्षणाचा कालावधी संपल्यानंतर सुरज मराठे यांची सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. डेक्कन जिमखान्यावरील आपटे रोडवरील एका हॉटेलमध्ये ते मंगळवारी उतरले होते.
त्यांची रूम बुधवारी दुपारपर्यंत बंद होती. त्यामुळे हॉटेलमधील कर्मचार्यानी दरवाजा वाजविला, तरीही त्यांनी आतून प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे हॉटेल चालकांनी पोलिसांना कळविले. पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले. हॉटेल कर्मचार्यानी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला.
आतमध्ये सुरज मराठे यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली होती. या घटनेस कोणाला जबाबदार धरू नये. वैयक्तिक वैद्यकीय कारणामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत आहोत, असे या चिठ्ठीत नमूद केले आहे. डेक्कन पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.


















