महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : लहानपणी केलेल्या गुन्ह्यातून आपल्यावर हल्ला होईल, या भीतीपोटी त्याने शस्त्र बाळगले होते. त्याची कुणकुण लागताच भारती विद्यापीठ पोलिसांनी या आरोपीला पकडून त्याच्याकडून गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त केले आहे.
अभिषेक कैलास दांगट (वय १९, रा. वृंदावन विश्व, तानाजी नवले इंडस्ट्रीज, नर्हे रोड) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर अल्पवयीन असताना सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक ८ जानेवारी रोजी पेट्रोलिंग करीत होते.
त्यावेळी पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नवले पुलाकडून कात्रजकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यावरील राजमाता उद्यानासमोरील बाजूच्या सर्व्हिस रोडवर एक व्यक्ती शस्त्र घेऊन थांबलेला आहे.
या माहितीच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथे जाऊन शोध घेतला. त्यांनी अभिषेक दांगट याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून ५० हजार रुपयांचा गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आला आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आर्म्स अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने हा गावठी कट्टा कोठून आणला व कशासाठी बाळगला होता, याचा तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, अण्णा दराडे, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेशा बारवकर, मंगेशा पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांनी केली आहे.


















