दारूच्या नशेत केले कृत्य, खराडी येथील घटनेत पोलिसांनी एकाला केली अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : एकत्र बसून दारू पिल्यानंतर झालेल्या वादात मित्रानेच मित्राच्या डोक्यात दारूची बाटली व दगड घालून खून केल्याचा प्रकार खराडीत घडला. खराडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आकाश तरळे (वय २३, रा. खांदवेनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. विजय ऊर्फ जलवा संजय वाघमारे (वय २३, रा. राजाराम पाटीलनगर, खराडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ही घटना खराडी येथील स्वीट इंडिया चौक येथे गुरुवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली.
याबाबत त्यांचा मित्र अमित भोसले यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित भोसले, विजय वाघमारे आणि आकाश तरळे हे मित्र असून त्यांनी गुरुवारी रात्री एकत्र दारू पिली. त्यानंतर ते स्वीट इंडिया चौक येथे गप्पा मारत बसले होते.
गप्पा मारत असताना त्यांच्यात वादावादी सुरू झाली. एकमेकांना शिवीगाळ करण्यावरून भांडण सुरू झाले. त्यावेळी विजय वाघमारे याने त्याच्याकडील बाटली आकाशच्या डोक्यात मारली आणि तेथील दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला.
गंभीर जखमी झालेल्या आकाशचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच खराडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी विजय वाघमारे याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे पुढील तपास करीत आहेत.


















