पोलीस आयुक्त अमितेशकुमार, रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त रायसिंग डे कार्यक्रम
पुणे : पुणे शहरातील वाहतुकीचा सरासरी वेग गेल्या वर्षभरात १९ कि.मी. प्रतितासावरून २२ कि.मी. प्रतितासापर्यंत वाढवण्यात यश आले आहे. पुढील काळात शहरातील वाहतुकीचा सरासरी वेग २६ कि.मी. प्रतितासापर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असून, त्याचवेळी अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी कठोर उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. तसेच वाहतूक नियम तोडणाऱ्यांसाठी १५ दिवसांच्या प्रशिक्षण कोर्सबाबत विचार सुरू असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सोमय मुंडे, वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव आदी उपस्थित होते.
अमितेश कुमार म्हणाले, शहरातील वाहतूक अधिक सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) ठिकाणांची शास्त्रशुद्ध ओळख करून तेथे विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी आयटीएमएस आधारित सिग्नल प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार असून, त्यामुळे सिग्नल नियोजन अधिक अचूक होऊन वाहतूक नियंत्रण प्रभावीपणे करता येईल. वेग वाढवणे आणि अपघात कमी करणे ही दोन्ही उद्दिष्टे एकाच वेळी साध्य करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत असून, नियमभंग करणाऱ्यांची वाहने जप्त केली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या शेवटी रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त ‘सडक सुरक्षा हीच जीवन रक्षा’ हा संदेश देत नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.
हिरोगिरी करणाऱ्यांना आता दणका देण्याची वेळ
दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात पोलीस प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका घेतली असून, गेल्या काही महिन्यांत ७ हजार ५०० जणांवर ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई करण्यात आली आहे. यापुढे अशा चालकांवर दंडात्मक कारवाईबरोबरच सार्वजनिक स्वरूपात ‘सत्कार’ केला जाईल, असे त्यांनी उपरोधिक शब्दांत सांगितले.
















