एच. एन. डी. हॉस्टेल प्रकरणातून उदयास आलेला युवकांचा आवाज : अक्षय जैन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 मध्ये जैन समाजाचे लक्षणीय मतदान असून, येथील आगामी महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची होताना दिसत आहे. भाजपकडून माजी सभागृह नेते निवडणूक रिंगणात असताना, काँग्रेस पक्षाने या प्रभागात “ड” गटातुन युवा, अभ्यासू आणि चळवळीतील कार्यकर्ता अक्षय जैन यांना उमेदवारी देऊन राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्या प्रभागात “कोण आहे अक्षय जैन?” हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून, त्यामागे प्रचारापेक्षा अक्षय जैन यांची प्रत्यक्ष आंदोलनात्मक भूमिका अधिक कारणीभूत ठरत आहे. काही दिवसांपूर्वी एच. एन. डी. हॉस्टेलच्या जमिनीबाबत संबंधित ट्रस्टींकडून ती जमीन एका बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप झाला होता.
विशेष म्हणजे, या बिल्डरला मोठ्या राजकीय शक्तीचा पाठिंबा असल्याची चर्चा प्रभागात उघडपणे सुरू होती. या प्रकरणात कोणताही दबाव न स्वीकारता अक्षय जैन यांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले.
समाजाच्या जमिनीवर होणारा कथित डल्ला त्यांनी जनतेसमोर आणला आणि या व्यवहाराला जोरदार विरोध करत एच. एन. डी. हॉस्टेल प्रकरणाला राजकीय वळण दिले. याच आंदोलनामुळे अक्षय जैन हे नाव प्रभागात वेगाने चर्चेत आले आहे.
यापूर्वीही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी अनेक आंदोलनांत सहभाग घेतलेला अक्षय जैन हा चळवळीचा कार्यकर्ता आणि अभ्यासू युवक नेतृत्व म्हणून ओळखला जातो. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने मैदानात उतरणारा नेता अशी त्यांची प्रतिमा तयार होत आहे.
काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष अॅड. अभय छाजेड यांनी अक्षय जैन यांच्यावर विश्वास दाखवत या प्रभागाची उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे, याच प्रभागातून अभय छाजेड यांनी पूर्वी स्वतः निवडणूक लढवली होती. त्यामुळे प्रभागाची राजकीय परिस्थिती लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
प्रभाग क्रमांक 21 ड मध्ये सध्या सुरु असलेली चर्चा – पारंपारिक आणि अनुभवी उमेदवारासमोर अक्षय जैन सारखा युवक प्रभावी ठरणार का? आणि वर्षानुवर्षे भाजपसोबत असलेला मतदार हा एच. एन. डी. हॉस्टेल प्रकरणातून पुढे आलेल्या या युवा नेतृत्वाला संधी देणार का? प्रभाग क्रमांक २१ ड मधील ही निवडणूक आता व्यक्ती विरुद्ध व्यक्ती न राहता, जुनी सत्ताकेंद्रित राजकारण विरुद्ध रस्त्यावरून उभे राहिलेले युवक नेतृत्व अशी होताना दिसत आहे.


















