आई-वडिलांसह पाच जणांना जेवणातून गुंगीचे औषध देऊन केले बेशुद्ध
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांच्यासह घरातील पाच जणांना नोकराने जेवणातून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर पूजा खेडकर हिचे हातपाय बांधून नुकत्याच नोकरीवर ठेवलेल्या हिकमत या नोकराने सहा साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकल्याचा प्रकार समोर आला आहे.
दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर, रखवालदार जितेंद्रसिंग, वाहनचालक दादासाहेब ढाकणे आणि स्वयंपाकी सुजित रॉय यांना जेवणातून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करण्यात आले होते. या सर्वांची प्रकृती आता सुधारत असून, हा प्रकार नेमका कसा घडला याची माहिती त्यांच्याकडून मिळाल्यानंतर संपूर्ण घटना स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
याबाबत पोलीस अंमलदार उमेश रजेसिंग कोळी यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी हिकमत व त्याच्या सहा साथीदारांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार त्यांच्या घरात रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजता घडला.
पूजा खेडकर यांचा बाणेर रोडवरील नॅशनल हौसिंग सोसायटीमध्ये बंगला आहे. त्यांच्या घरात दहा ते पंधरा दिवसांपूर्वी एक नोकर कामावर ठेवण्यात आला होता. दिलीप खेडकर व मनोरमा खेडकर यांनी शनिवारी रात्री जेवण केले होते. पूजा खेडकर या जिममधून रात्री उशिरा घरी आल्या.
त्यांनी घरात पाहिले असता आई-वडील बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. त्याच वेळी घरात शिरलेल्या पाच ते सहा चोरट्यांनी त्यांना पकडून हातपाय चिकटपट्टीने बांधले. त्यानंतर घरातील मौल्यवान वस्तू चोरून नेण्यात आल्या.
काही वेळाने त्यांनी स्वतःची सुटका करून दिल्लीतील मित्राला फोन केला. या मित्राने त्याच्या चुलत भावाला फोन करून हा प्रकार सांगितला. तो तातडीने मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या बंगल्यावर पोहोचला.
त्याने तेथे नाकाबंदी करीत असलेल्या पोलिसांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्यांच्या बंगल्यात जाऊन पाहणी केली. तेव्हा बंगल्याच्या कार पार्किंगजवळ रखवालदार जितेंद्रसिंग हा बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. खेडकर यांचे आई-वडील पलंगावर बेशुद्ध अवस्थेत आढळले.
एका खोलीत वाहनचालक दादासाहेब ढाकणे, तर बंगल्याबाहेरील एका खोलीत स्वयंपाकी सुजित रॉय हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. आई-वडिलांची प्रकृती चिंताजनक असल्याने उपचारानंतर तक्रार देईन, असे पूजा खेडकर हिने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. चतु:श्रृंगी पोलीस अधिक तपास करीत आहेत.


















