काळेपडळ पोलिसांनी तिघांवर केला गुन्हा दाखल : बुलेट जप्त करून करणार कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वाहनांची सातत्याने ये-जा असलेल्या रस्त्यावर भरदुपारी रॉयल एनफिल्ड बुलेटला फटाक्यासारखे आवाज करणारे सायलेन्सर लावून मोठ्या आवाजात तिघा बुलेटस्वारांनी स्पर्धा लावली. लोकांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या या तिघा तरुणांवर काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे हे बुलेटस्वार विनापरवाना वेगाने बुलेट चालवत असल्याचे दिसून आले.
याबाबत पोलीस हवालदार श्रीकृष्ण उत्तमराव खोकले यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी मयूर संजय तुपे (वय २७, रा. माळवाडी, हडपसर), यश संतोष भोसले (वय २३, रा. होळकरवाडी, खोटेनगर) आणि तुकाराम अशा तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार महंमदवाडी येथील पाटील कट्टा समोरील रस्त्यावर रविवारी दुपारी पावणे दोन वाजता घडला. रॉयल एनफिल्ड बुलेटला मोठा आवाज करणारे सायलेन्सर लावून वेगाने गाड्या चालवून रस्त्यावरील लोकांच्या जीवाला धोका निर्माण केला जातो.
असे आवाज करणारे सायलेन्सर लावलेल्या गाड्या ताब्यात घेऊन वाहतूक पोलिसांनी काही हजार सायलेन्सर वेळोवेळी तोडून टाकले आहेत. महंमदवाडी येथील ६० फूट रस्ता नेहमी वाहनांनी गजबजलेला असतो.
अशा रस्त्यावर रविवारी दुपारी तिघांनी बुलेटला फटाके वाजणारे सायलेन्सर लावून मोठमोठ्याने आवाज करत एकमेकांच्या दुचाकींशी स्पर्धा लावून वेगाने जात होते. काळेपडळ पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यातील दोघांना पकडले.
त्यांच्या गाडीची कागदपत्रे तपासली असता ते विनालायसन्स गाडी चालवून स्वतःच्या व दुसऱ्यांच्या जीविताची काळजी न घेता भरधाव जात असल्याचे आढळले. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
त्यांना नोटीस देण्यात आली असून त्यांची बुलेट जप्त करण्यात येऊन आरटीओकडे पुढील कारवाईसाठी पाठविण्यात येणार आहे. सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे तपास करीत आहेत.


















