महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : भारत सरकारद्वारे नियुक्त सुमारे १४ हजार नोटरी वकिलांची नोंदणीकृत शिखर संघटना असलेल्या ‘नोटरी प्रॅक्टिशनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य’ च्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पुणे शहर कार्याध्यक्षपदी अॅड. विशाल दिलीप शिंगवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून, पुणे शहरातील नोटरी वकिलांना एक सक्षम व अभ्यासू नेतृत्व लाभले आहे.
आंबेडकर भवन पुणे येथे दि. ९ जानेवारी रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय पदग्रहण समारंभात या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲड. गोवाचे अध्यक्ष हर्षद निंबाळकर, तसेच पुणे बार असोसिएशन चे अध्यक्ष ॲड. हेमंत झंझाड, ॲड. अहमद पठाण, ॲड. राजेंद्र उमाप, ॲड. इब्राहिम शेख, ॲड. हरीश तावरे आणि ॲड. भूपेंद्र गोसावी यांच्या हस्ते अॅड. विशाल शिंगवी यांना नियुक्तीपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरवण्यात आले.
संघटनेच्या माध्यमातून नोटरी वकिलांच्या समस्या सोडवणे, त्यांचे हक्क अबाधित ठेवणे आणि संघटनात्मक बळकटीकरण करणे, हा या नव्या कार्यकारिणीचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, अॅड. विशाल शिंगवी हे जीतो पुणेचे सह-सचिव तसेच ज्येष्ठ विधी सल्लागार म्हणूनही सक्रिय भूमिका बजावत असून, त्यांच्या अनुभवाचा आणि संघटनात्मक कौशल्याचा लाभ पुणे शहरातील नोटरी वकिलांना निश्चितच होईल, असा विश्वास विधी क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला आहे.


















