शवविच्छेदनातही समजू शकले नाही मृत्यूचे कारण : व्हिसेरा ठेवला राखून
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कोंढव्यातील एका चाळीत एक दाम्पत्य मृतावस्थेत आढळून आले. याबाबत येवलेवाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. शवविच्छेदनातही त्यांच्या मृत्युमागील नेमके कारण समजू शकले नाही. डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे.
प्रकाश मुंडे (वय ५२) आणि ज्ञानेश्वरी मुंडे (वय ४८) अशी मृतावस्थेत आढळलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. मुंडे दाम्पत्य जमिनीवर पांघरूण टाकून झोपले होते. थंडीमुळे आखडून त्यांचा मृत्यू झाला की त्यामागे आणखी काही कारण आहे, हे आता व्हिसेराची तपासणी झाल्यानंतर समजू शकणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंडे कुटुंबीय कोंढव्यातील श्रद्धानगर भागातील एका चाळीत राहायला होते. मुंडे दाम्पत्याचा मुलगा गणेश मुंडे (वय २३) हा एका खासगी कंपनीत नोकरी करतो. तो शुक्रवारी (९ जानेवारी) सकाळी रात्रपाळीवरून घरी आला.
तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. गणेशने दरवाजा वाजविला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्याने शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा वडील प्रकाश आणि ज्ञानेश्वरी हे जमिनीवर झोपलेले आढळून आले.
मुंडे दाम्पत्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता. ज्ञानेश्वरी मुंडे यांना ब्रेन ट्यूमर होता. त्या वर्षभरापासून आजारी होत्या. प्रकाश हे चालक म्हणून काम करीत होते. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.
शवविच्छेदनात डॉक्टरांना मृत्युमागील नेमके कारण सांगता आलेले नाही. डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे. येवलेवाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली असल्याचे येवलेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर काळंगे यांनी सांगितले आहे.


















