महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची ४६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका ४२ वर्षांच्या तरुणाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुण मांजरी खुर्द परिसरात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी सप्टेंबर महिन्यात तरुणाशी संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे चोरट्यांनी त्याला सांगितले.
त्यानंतर तरुणाला शेअर बाजारातील गुंतवणूक योजनेबाबतचे एक अॅप सुरू करण्यास सांगितले. तरुणाने अॅप सुरू केले. सुरुवातीला तरुणाने काही रक्कम गुंतविली. चोरट्यांनी त्याला परताव्यापोटी काही रक्कम दिली. बँक खात्यात परतावा जमा झाल्याने तरुणाचा विश्वास बसला. त्यानंतर या तरुणाने चोरट्यांनी सांगितलेल्या खात्यात वेळोवेळी ४६ लाख ३३ हजार रुपये जमा केले.
पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्याला परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे तपास करीत आहेत.
‘ऑनलाइन टास्क’ च्या आमिषाने फसवणूक – वर्क फ्रॉम होम पार्ट टाइम पद्धतीने कामाची संधी असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी सिंहगड रस्ता भागातील एका तरुणाची ४ लाख ८३ हजार रुपयांची फसवणूक केली. फिर्यादी तरुण सिंहगड रस्ता भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी तरुणाशी संपर्क साधून पार्ट टाइम जॉबची संधी असे आमिष दाखविले होते. चोरट्यांनी सुरुवातीला तरुणाला एक काम दिले. या कामाचे पैसे तरुणाच्या खात्यात जमा करण्यात आले. चोरट्यांनी आणखी पैसे गुंतविल्यास परतावा चांगला मिळेल, असे आमिष दाखवून तरुणाला जाळ्यात ओढले. तरुणाने चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केल्यानंतर त्याला परतावा न देता ४ लाख ८३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.


















