धनुर्मासानिमित्त माँ आशापुरा माता मंदिरात दोन दिवसीय धार्मिक उत्सव
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : धनुर्मासाच्या पवित्र निमित्ताने माँ आशापुरा माता मंदिर, गंगाधाम चौक, पुणे येथे श्री गोदम्बाजी–रंगनाथजी यांचा विवाह सोहळा अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात पार पडला. हा दोन दिवसीय धार्मिक सोहळा १० व ११ जानेवारी रोजी पारंपरिक वैदिक विधी, पूजा-अर्चा आणि मंगलकार्यांच्या साक्षीने संपन्न झाला.
शनिवारी हळदी, मेहंदी व संगीताचा कार्यक्रम मोठ्या आनंदात पार पडला, तर रविवारी विधिवत विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. धनुर्मास हा भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणारा अत्यंत पवित्र काळ मानला जातो.
पौराणिक कथेनुसार माता गोदादेवीने भगवान विष्णूंना पतीरूपात प्राप्त करण्यासाठी २७ दिवस उपवास, भजन-कीर्तन व तपश्चर्या केली होती. तिच्या अखंड भक्तीने प्रसन्न होऊन धनुर्मासाच्या २७व्या दिवशी भगवान विष्णूंनी गोदादेवीशी विवाह केला, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
याच पार्श्वभूमीवर देशभरात विविध ठिकाणी श्री गोदम्बाजी–रंगनाथजी विवाह सोहळा श्रद्धेने साजरा केला जातो. भाविक पहाटे उठून प्रार्थना, विष्णु सहस्त्रनाम पठण तसेच विधिवत पूजन करतात. भगवान विष्णूंसह गोदादेवीचीही विशेष पूजा केली जाते. धनुर्मासात गोदा–रंगनाथ कल्याण उत्सवाला विशेष धार्मिक महत्त्व आहे.
माँ आशापुरा माता मंदिरात गेल्या एक महिन्यापासून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून, मंदिर व भक्तांच्या वतीने दररोज सकाळी भावपूर्ण भजन-कीर्तन तसेच प्रसादीचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.
या विवाह सोहळ्यात वर पक्षाकडून राजेश जागृति सोनी परिवार, तर वधू पक्षाकडून राजेश जसवंतीबेन मेहता परिवार सहभागी झाले होते. ट्रस्टच्या वतीने भारती भंडारी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
विवाह सोहळ्यानिमित्त सनई-चौघडे तसेच ढोल-ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता. या प्रसंगी विविध धार्मिक विधी, पूजा-अर्चा व मंगलकार्ये पार पडली. धनुर्मास काळात गेल्या ३० दिवसांपासून दररोज सकाळी भजन-कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिलीप मुनोत, श्याम खंडेलवाल, राजेंद्र गोयल, मंगेश कटारिया यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या समन्वयामुळे हा विवाह सोहळा अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


















