नातेवाईकाच्या नावाने एपीके फाईल पाठवून अडीच लाखांना गंडा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) वाहतूक नियमभंगाबाबत दंडात्मक कारवाई केल्याचे बनावट ई-चलन पाठवून सायबर चोरट्यांनी एका तरुणाची तब्बल २ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी कात्रज येथील ४५ वर्षीय नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ९ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर २०२५ या कालावधीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कात्रज परिसरातील खोपडेनगर भागात वास्तव्यास आहेत. सायबर चोरट्यांनी फिर्यादीच्या मोबाईल क्रमांकावर त्यांच्या मेहुण्याच्या मोबाईलवरून आरटीओ ई-चलनासंदर्भातील एपीके (APK) फाईल पाठवली. ही फाईल मेहुण्यानेच पाठवली असल्याचा समज करून फिर्यादीने ती उघडली. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलचा संपूर्ण अॅक्सेस स्वतःकडे घेतला.
यानंतर सायबर चोरट्यांनी फिर्यादीकडील आधारकार्ड, बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवून त्याचा गैरवापर केला. या माहितीच्या आधारे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून विविध व्यवहार करत २ लाख ६० हजार रुपये काढून घेण्यात आले. मोबाईलचा अॅक्सेस फिर्यादीकडे नसल्यामुळे बँकेकडून पाठविण्यात आलेले व्यवहारासंदर्भातील संदेश त्यांना प्राप्त झाले नाहीत.
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादीने बँकेत चौकशी केली असता फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पुढील तपासासाठी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे पुढील तपास करीत आहेत.


















