चतु:श्रृंगी पोलिसांकडून नोकराच्या वडिलांना मुंब्रावरून ताब्यात
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या बाणेर रोडवरील बंगल्यात दरोड्याची घटना घडल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. खेडकर यांच्या बंगल्यात तिच्या आई-वडिलांसह पाच जणांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करून दरोडा टाकण्यात आला होता.
खुम्मा दिलबहादुर शाही (वय ४०, रा. कौशल, मुंब्रा, जि. ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. खुम्मा शाही हा खेडकर यांच्याकडे नुकताच कामाला लागलेल्या हिकमत याचा वडील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पूजा खेडकर यांच्या नॅशनल हौसिंग सोसायटीतील बंगल्यात हिकमत हा नोकर १० ते १५ दिवसांपूर्वीच कामाला लागला होता. शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हिकमतने खेडकर यांचे आई-वडील, रखवालदार, स्वयंपाकी आणि वाहनचालक यांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले.
याच दरम्यान पूजा खेडकर या बाहेरून घरी परतल्या. त्यांना पाहताच चोरट्यांनी त्यांचे हातपाय चिकटपट्टीने बांधून ठेवले आणि घरातील मौल्यवान वस्तू घेऊन ते पसार झाले. घरातील सर्व प्रमुख व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत असल्याने हा प्रकार नेमका कसा घडला, याची सविस्तर माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र, बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एकूण सात चोरटे दिसून आले आहेत.
या प्रकरणाचा तपास करताना चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हिकमत या नेपाळी नोकराचा शोध सुरू केला. तपासादरम्यान त्याचे वडील खुम्मा शाही हे मुंब्रा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा त्यांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या खुम्मा शाही यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपासात या दरोड्याचा नेमका कट कसा रचला गेला, याबाबत अधिक माहिती उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


















