डॉ. दत्ता कोहिंकर यांना ‘स्वामी विवेकानंद पुरस्कार २०२६’ प्रदान
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : पुणे : विचार, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचा जागर करत सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात शिक्षण, समाजसेवा व राष्ट्रउभारणीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. दत्ता कोहिंकर यांना मानाचा ‘स्वामी विवेकानंद पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. या वेळी दोन्ही थोर विभूतींच्या विचारांचा, आदर्शांचा व राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचा सखोल आढावा घेण्यात आला. युवकांनी चारित्र्यसंपन्न, आत्मविश्वासपूर्ण व समाजाभिमुख जीवन जगावे, असा संदेश मान्यवरांनी दिला.
पुरस्कार स्वीकारताना डॉ. दत्ता कोहिंकर यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले. “स्वामी विवेकानंदांनी युवकांना आत्मविश्वास, शिस्त व राष्ट्रभक्तीचा मंत्र दिला, तर राजमाता जिजाऊंनी शिवरायांसारख्या आदर्श नेतृत्वाची घडण केली.
हे विचार अंगीकारल्यास सक्षम व सशक्त भारत घडू शकतो,” असे ते म्हणाले. हा पुरस्कार पुढील कार्यासाठी अधिक ऊर्जा देणारा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी मूल्याधिष्ठित व संस्कारक्षम शिक्षणावर भर दिला.
“स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ ही केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे नसून आजच्या पिढीसाठी प्रेरणास्रोत आहेत. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसोबत सामाजिक भान, नैतिकता व राष्ट्रप्रेम जोपासावे, हेच सूर्यदत्त संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे,” असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास संस्थेच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विचारप्रवर्तक मनोगते, सन्मान सोहळा आणि प्रेरणादायी वातावरणामुळे हा कार्यक्रम सर्व उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.


















