दोघा भामट्यांवर चौथा गुन्हा दाखल : आतापर्यंत १८ कोटींहून अधिक रकमेची फसवणूक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सदाशिव पेठेतील एका औषध वितरकाची तब्बल ३ कोटी ५४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोघा भामट्यांविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांवर यापूर्वीही अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, आतापर्यंत त्यांनी १८ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गंडा घातल्याचे तपासात उघड झाले आहे.
सोनाली लक्ष्मण गिरीगोसावी (वय ४२, रा. अर्चना कोहिनूर ग्लोरी, महंमदवाडी, हडपसर) आणि जयेश वसंत जैन (वय ४१, रा. भक्ती पूजा अपार्टमेंट, गुलटेकडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या दोघांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात हा चौथा गुन्हा दाखल झाला असून, न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.
याबाबत दिनेश सुभाष कर्नावट (वय ५१, रा. ठुबे पार्क, शिवाजीनगर) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत सदाशिव पेठेतील गाडगीळ रस्त्यावर असलेल्या सिनिअर एजन्सी येथे घडली.
फिर्यादीच्या माहितीनुसार, सोनाली गिरीगोसावी हिने सुरुवातीला रोख रक्कम देऊन औषधांची खरेदी केली. त्यामुळे वितरकाचा विश्वास संपादन झाल्यानंतर तिने जयेश जैन याला क्रेडिटवर माल द्यावा, पैसे आपण देऊ, असे आश्वासन दिले.
त्यानंतर दोघांनी मिळून ३ कोटी ५४ लाख ५५ हजार ३२९ रुपयांची औषधे खरेदी करून पैसे न देता फसवणूक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जानराव करीत आहेत.


















