५ फेब्रुवारीला मतदान, ७ फेब्रुवारीला मतमोजणी : १२४ मतदान केंद्रांवर १.०२ लाख मतदारांचा सहभाग
भूम : भूम तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, जिल्हा परिषदेच्या पाच गटांसाठी आणि पंचायत समितीच्या दहा गणांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रेवैय्या डोंगरे यांनी तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जयवंतराव पाटील व नायब तहसीलदार प्रवीण जाधव उपस्थित होते. आरक्षण यापूर्वीच जाहीर झाले असून, १३ जानेवारीपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. १६ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार असून, २१ जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करता येतील.
२२ जानेवारी रोजी अर्जांची छाननी होईल, तर २३ ते २७ जानेवारीदरम्यान अर्ज मागे घेण्याची मुदत राहील. २७ जानेवारी रोजी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. ५ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल आणि ७ फेब्रुवारी रोजी परंडा रोडवरील शासकीय निवासी शाळेत मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे डोंगरे यांनी सांगितले.
गटानुसार मतदारसंख्या
ईट – २०,५६३ (पुरुष १०,९०५ | महिला ९,६५८)
सुटका – २०,८९९ (पुरुष ११,१२९ | महिला ९,७७०)
पाथरूड – १९,८४९ (पुरुष १०,६१६ | महिला ९,२३३)
वालवड – १९,९४२ (पुरुष १०,६०२ | महिला ९,३४०)
आष्टा – २०,८७७ (पुरुष ११,०१७ | महिला ९,८६०)
प्रशासन सज्ज
निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, तालुक्यात एकूण १२४ मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. या निवडणुकीत एकूण १,०२,१३० मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, त्यामध्ये ५४,२६९ पुरुष आणि ४७,८६१ महिला मतदारांचा समावेश आहे.
















