मतमोजणीपासून दूर ठेवण्यासाठी ‘लाल तंबू’चा प्रयोग
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांवर थेट अन्याय करणारा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 20, 21 आणि 26 च्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान निवडणूक आयोगाकडून पत्रकारांसाठी करण्यात आलेली व्यवस्था अत्यंत अपुरी व गैरसोयीची असल्याची तीव्र प्रतिक्रिया पत्रकार वर्गातून व्यक्त होत आहे.
ज्या ठिकाणी प्रत्यक्ष मतमोजणी सुरू आहे, त्या ठिकाणापासून पूर्णपणे दूर, बाहेरच फक्त एक लाल तंबू उभारून पत्रकार कक्ष तयार करण्यात आला आहे. ना मूलभूत सुविधा, ना प्रत्यक्ष माहिती मिळण्याची सोय. हा प्रकार म्हणजे पत्रकारांना मतमोजणी प्रक्रियेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला जात आहे.
मतदान असो वा मतमोजणी जर एखादा गोंधळ, गैरप्रकार किंवा संशयास्पद घटना घडली, तर ती प्रत्यक्ष पाहणे आणि लोकांपर्यंत पोहोचवणे ही पत्रकारांची जबाबदारी आहे. मात्र, पत्रकारांनाच मुख्य प्रक्रियेपासून दूर ठेवल्यास सत्य बाहेर येणार तरी कसे, असा सवाल उपस्थित होत आहे.
“मतमोजणी जिथे सुरू आहे, तिथेच पत्रकारांना बसवणे ही लोकशाहीची गरज आहे. पण निवडणूक आयोगाच्या मनमानी निर्णयांमुळे पत्रकारांच्या अधिकारांवर गदा येत आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया पत्रकार संघटनांकडून व्यक्त होत आहे.
हा प्रकार केवळ व्यवस्थेतील त्रुटी नसून, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरच आघात करणारा आहे. पारदर्शक निवडणूक प्रक्रिया हवी असेल, तर पत्रकारांना दुय्यम वागणूक न देता योग्य सन्मान आणि प्रवेश देणे आवश्यक आहे.
निवडणूक आयोगाने तात्काळ याची दखल घेऊन पत्रकारांसाठी योग्य, सुरक्षित आणि प्रत्यक्ष मतमोजणीस्थळीच व्यवस्था करावी, अन्यथा हा मुद्दा अधिक तीव्र आंदोलनाचे रूप घेऊ शकतो, असा इशाराही पत्रकारांकडून देण्यात आला आहे.
















