महिलेला जीवे ठार मारण्याची दिली धमकी : वडगाव बुद्रुक येथील घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गँगस्टर गजा मारणेच्या टोळीतील एका गुंडाने महिलेला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिची जमीन बळकावल्याचा प्रकार समोर आला आहे. सिंहगड रोड पोलिसांनी या गुंडावर गुन्हा दाखल केला आहे.
वाघु तुकाराम हळंदे (रा. वारजे) व त्याचे साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्या गुंडांची नावे आहेत. याबाबत आंबेगाव पठार येथील ५३ वर्षीय महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सिंहगड कॉलेजच्या पाठीमागील बाजूच्या प्लॉटवर मे २०२४ पासून आतापर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मूळच्या बार्शी तालुक्यातील श्रीपद पिंपरी येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पती दत्ता किसन पिंगळे यांनी सोपान गणपत काळे यांच्याकडून वडगाव बुद्रुक येथील ८५० चौरस फूट जागा दस्तऐवजाद्वारे विकत घेतली होती. ही जागा त्यांच्या कुटुंबाच्या मालकी हक्काची व ताबा-वहिवाटीची होती. फिर्यादींच्या पतीचे निधन झाले आहे.
गजानन मारणेचा माणूस वाघु हळंदे व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची भीती दाखवून त्यांच्या जागेवर बेकायदेशीररीत्या ताबा मिळवून जबरदस्तीने जागा बळकावली आहे. त्यांच्या मालकीच्या जागेवर जाण्यास मज्जाव करून कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणाचा गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने तपास करीत आहेत.















