शेतीचा पंचनामा करण्यासाठी मागितली होती लाच : एसीबीने सापळा रचून केली अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दोन भावांमधील वाटणीवरून शेतीचा पंचनामा करण्यासाठी तसेच पुढील सहकार्य करण्याच्या बदल्यात १० हजार रुपयांची लाच मागून ७ हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्राम महसूल अधिकाऱ्याला सापळा रचून रंगेहाथ पकडले.
प्रमिला नागेशा वानखेडे (वय ४२, रा. तक्षशिला सोसायटी, पठारे ठुबे नगर, खराडी) असे या ग्राम महसूल अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदारांची शिरसगाव काटा येथे वडिलोपार्जित जमीन असून, त्यांच्या वडिलांनी तोंडी वाटप करून दिलेल्या शेतीची ते लेव्हल करत होते.
त्यांच्या भावाने लेव्हल थांबवून वाटणीप्रमाणे रेकॉर्ड झाल्यानंतरच लेव्हल कर आणि ऊसही नंतर तोडणी कर, असे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी काम थांबवले होते. ९ जानेवारी रोजी शिरसगाव काटा गावाच्या महिला तलाठी यांनी तक्रारदार यांच्या शेतातील राहत्या घरी जाऊन,
“तुमच्या शेताचा पंचनामा करायचा आहे. तुम्ही माती विकत असल्याबाबत तक्रार आली आहे. तुम्ही तलाठी कार्यालयात येऊन भेटा,” असे सांगितले. त्यानंतर १२ जानेवारी रोजी तक्रारदार ग्राम महसूल अधिकारी प्रमिला वानखेडे यांच्या कार्यालयात भेटीस गेले. त्या वेळी त्यांनी तक्रारदारांना, “तुम्ही मला १० हजार रुपये द्या. तुमच्या बाजूने पंचनामा करते,” असे सांगून लाचेची मागणी केली.
तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १६ जानेवारी रोजी शिरसगाव काटा तलाठी कार्यालयात पडताळणी केली. त्या वेळी प्रमिला वानखेडे यांनी तक्रारदाराच्या बाजूने शेतीचा पंचनामा करण्यासाठी व पुढील सहकार्य करण्यासाठी तडजोडीअंती ७ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १६ जानेवारी रोजी शिरुरमधील नाव्हरा–तळेगाव रोडवरील छत्रपती संभाजीराजे चौक येथे सापळा रचला. तक्रारदारांकडून ७ हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने प्रमिला वानखेडे यांना रंगेहाथ पकडले. त्यांना ताब्यात घेऊन शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील व अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. पोलीस उपअधीक्षक भारती मोरे तपास करीत आहेत.















