येरवड्यातील तरुणाला जळगावमधील दोघांनी घातला गंडा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : रेल्वेमध्ये पत्नी व भावाला नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून १४ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी जळगावमधील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत येरवड्यातील रामनगर येथील ३७ वर्षांच्या तरुणाने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सागर दिगंबर पाटील (वय ३५) आणि स्वप्नील मुरलीधर गायकवाड (वय ३३, दोघे रा. तळई, ता. एरंडोल, जि. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार २३ ऑगस्ट २०२३ ते ऑगस्ट २०२५ दरम्यान येरवड्यातील रामनगर येथे घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची खडकवासला येथे कामाला असलेल्या सागर पाटील याच्याशी दोन वर्षांपूर्वी ओळख झाली होती.
पाटील याने गायकवाड याची रेल्वेतील मोठ्या अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगत, कोणाला नोकरीला लावायचे असल्यास सांगण्याचे आश्वासन दिले होते. फिर्यादी यांच्या पत्नी व भावाला रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष आरोपींनी दाखविले होते. त्यानंतर आरोपींनी तरुणाकडून वेळोवेळी १९ लाख १५ हजार रुपये घेतले.
नोकरीबाबत विचारणा केल्यानंतर आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. दिनेश राठोड यांनी पैशांची मागणी केल्यानंतर आरोपींनी ५ लाख रुपये परत केले व उर्वरित पैसे देण्याचे आश्वासन दिले. मात्र उर्वरित रक्कम देण्यास आरोपींनी टाळाटाळ केली. अखेर तरुणाने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक मिथुन सावंत पुढील तपास करत आहेत.

















