महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने वारजे माळवाडी भागातून अटक केली.
सागर गणेश सुतार (वय २५, रा. दुगादेवी मंदिराजवळ, गणपती माथा, वारजे माळवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
सुतार याच्याविरुद्ध वारजे माळवाडी, सिंहगड रोड, हवेली आणि उत्तमनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, चोरी, दंगल माजविणे, आर्म्स ॲक्टअंतर्गत असे गंभीर स्वरूपाचे ८ गुन्हे दाखल आहेत. खंडणीविरोधी पथक वारजे भागात गस्त घालत असताना पोलीस हवालदार अमोल आव्हाड व पोलीस अंमलदार मयूर भोकरे यांना माहिती मिळाली की सराईत गुन्हेगार सुतार हा शिवणे परिसरात थांबला असून त्याच्याकडे पिस्तूल आहे.
या माहितीनुसार पोलिस पथकाने शिवणे येथे थांबलेल्या सागर सुतार याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ४० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे आढळून आली.
सागर सुतार हा सराईत गुन्हेगार असून वारजे व उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळगावे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, पोलीस हवालदार सयाजी चव्हाण, पोलीस अंमलदार बालारफी शेख, दुर्योधन गुरव, नितीन कांबळे आणि मयूर भोकरे यांनी केली आहे.

















