फोटोसहित तक्रारीनंतर ई-चलानद्वारे कारवाई : तक्रारदारांची माहिती राहणार गोपनीय
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहनचालक आणि अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी ‘पुणे ट्रॅफिक (PTP) अॅप’ सुरू केले असून, या अॅपमुळे सामान्य नागरिकांनाही नियमभंगावर थेट कारवाईत सहभागी होता येणार आहे.
शहरातील वाहतूक शिस्त सुधारण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी विकसित केलेल्या ‘पुणे ट्रॅफिक (PTP) अॅप’च्या माध्यमातून नागरिकांना नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरोधात फोटोसहित तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या अॅपद्वारे सिग्नल तोडणे, ट्रिपल सीट, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, राँग साईडने वाहन चालवणे, नो-पार्किंगमध्ये वाहन उभे करणे तसेच रस्त्यावरील बेवारस वाहनांबाबत तक्रार करता येणार असून, संबंधित वाहनचालकावर ई-चलानद्वारे कारवाई केली जाणार आहे. तक्रारदारांची ओळख पूर्णतः गोपनीय ठेवली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ही माहिती पुणे वाहतूक शाखेचे सहआयुक्त मनोज पाटील यांनी ‘मंथन’ या विचार व्यासपीठाच्या बैठकीत दिली. त्यांनी सांगितले की, पुणे शहरात सध्या ४५ ते ५० लाख नोंदणीकृत वाहने असून दरवर्षी २.५ ते ३ लाख नवीन वाहने रस्त्यावर येत आहेत.
मात्र रस्त्यांची क्षमता मर्यादित असल्याने वाहतूक कोंडी आणि नियमभंगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. दरवर्षी १२ ते १५ हजार रस्ते अपघात होत असून त्यात सुमारे ५०० नागरिकांचा मृत्यू होतो आणि हजारो जण जखमी होतात. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
बैठकीत ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, लोकमत वृत्तपत्र समूहाचे संपादक विजय बाविस्कर, सी. ए. अनिल वखारीया, प्रविण शुक्ला, राजकुमार चोरडिया, डॉ. सतीश देसाई, पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया, पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, पूना मर्चंट्स चेंबरचे माजी अध्यक्ष रायकुमार नहार, उपाध्यक्ष अजित बोरा, पोलीस निरीक्षक देवेंद्र पवार, ललित गुंदेचा, चेंबरचे सचिव ईश्वर नहार, सहसचिव आशिष दुगड, मुकेश छाजेड, दिनेश मेहता, उत्तम बाठिया, शाम लड्ढा आदी उपस्थित होते.
उपस्थितांनी नागरिकांच्या वाहतूकविषयक विविध समस्या मांडल्या. त्यावर सहआयुक्त पाटील यांनी AI प्रणाली, स्मार्ट सिग्नल, सुधारित पार्किंग नियोजन आणि जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून सुधारणा सुरू असल्याचे सांगितले.
दरम्यान, पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी व्यापारी संघटना प्रशासनासोबत समन्वय साधून वाहतूक जनजागृतीसाठी सहकार्य करतील, असे स्पष्ट केले. प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे जबाबदारी स्वीकारल्यासच पुण्याची वाहतूक अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
















