सहकारनगर पोलिसांची कामगिरी : सीमकार्ड रिचार्जवरून चोरट्यांचा लावला शोध
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : डॉक्टरांना होम व्हिजिटचा बहाणा करून बोलावून त्यांना चाकूचा धाक दाखवत दोघा चोरट्यांनी लुबाडले होते. आपल्यापर्यंत पोलिस पोहोचू नयेत, यासाठी त्यांनी ओडिशा राज्यातील सीमकार्डचा वापर केला होता. अगदी फुलप्रूफ प्लॅन आखला होता. मात्र, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत सहकारनगर पोलिसांनी कॉलसेंटरमध्ये काम केलेल्या दोघा चोरट्यांना जेरबंद करून आपण मागे नसल्याचे दाखवून दिले.
गौरंग किरण देसाई (वय २५, रा. राजयोग सोसायटी, कदम प्लाझासमोर, कात्रज) आणि शुभम उमेश शिंदे (वय २८, रा. साईनगर, साळवे गार्डनजवळ, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
गौरंग देसाई आणि शुभम शिंदे हे दोघेही कॉलसेंटरमध्ये काम करत होते. तेथील नोकरी सुटल्यानंतर ते गुन्हेगारीकडे वळले. शुभम शिंदे याच्याविरुद्ध मेघालयात अमली पदार्थ तस्करीचा गुन्हा यापूर्वी दाखल आहे.
या दोघांनी गुन्हा करण्यासाठी ओडिशा राज्यातील मोबाईल सीमकार्डचा वापर केला होता. या सीमकार्डचा वापर त्यांनी केवळ संबंधित डॉक्टरांना फोन करण्यासाठीच केला होता. अतिशय सुनियोजित पद्धतीने केलेल्या क्लिष्ट गुन्ह्याची उकल सहकारनगर पोलिसांनी केली आहे.
वैद्यकीय प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना १ जानेवारी २०२६ रोजी एका व्यक्तीने फोन केला. त्याने त्याची आई आजारी असल्याचे सांगून तपासणीसाठी होम व्हिजिट देण्याच्या बहाण्याने डॉक्टरांना पुणे–सातारा रोडवरील अथर्व फरिहाज इमारतीत बोलावून घेतले.
या इमारतीच्या पार्किंगमधील अंधाराचा गैरफायदा घेत डॉक्टरांकडील बीएमडब्ल्यू मोटारसायकल, मोबाईल, बॅग व त्यामधील चांदीचा जग, तसेच रोख रक्कम असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा माल जबरदस्तीने चोरून नेण्यात आला होता.
या मोबाईल सीमकार्डचा वापर करून केवळ एकच फोन करण्यात आल्याने आरोपींचा माग काढणे कठीण झाले होते. मात्र, हे सीमकार्ड कोठून रिचार्ज करण्यात आले होते, याचा पोलिसांनी सखोल तपास केला. त्यावरून आरोपींपर्यंत पोहोचून त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी हा मोबाईल व सीमकार्ड ओडिशामधील एका व्यक्तीकडून मिळाल्याचे सांगितले.
आरोपींकडून बीएमडब्ल्यू मोटारसायकल, एक मोबाईल, रोख रक्कम व चांदीचा जग असा ४ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सद्दाम हुसेन फकीर करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सद्दाम हुसेन फकीर, गणेश कर्चे, सहायक फौजदार बापुसाहेब खुटवड, पोलीस हवालदार अमोल पवार, चंद्रकांत जाधव, किरण कांबळे, निलेश शिवतारे, पोलीस अंमलदार अभिमान बागलाने, किर्तीकर, पदमाळे, भगत, सागर सुतकर, ढोले, मारुती नलवाड, रफिक तडवी, बालाजी केंद्रे यांनी केली आहे.
















