सायबर चोरट्यांच्या जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडणाऱ्यांमध्ये मध्यमवर्गीय अधिक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका परिचारिकेची ५३ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी परिचारिकेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या ५१ वर्षीय परिचारिका घोरपडी येथील बी. टी. कवडे रस्त्यावर राहतात. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाईलवर संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. शेअर बाजारातील गुंतवणूक योजनेची माहिती त्यांना देण्यात आली.
सायबर चोरट्यांनी महिलेला बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यांनी केलेल्या पहिल्या गुंतवणुकीवर ३९ हजार ६६९ रुपयांचा नफा झाल्याचे सांगून ती रक्कम त्यांना परत करण्यात आली. त्यामुळे या महिलेचा विश्वास बसला. त्यानंतर महिलेने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी ५३ लाख ४८ हजार रुपये जमा केले.
मात्र पैसे जमा केल्यानंतर त्यांना कोणताही परतावा देण्यात आला नाही. महिलेने परताव्याबाबत विचारणा केली असता चोरट्यांनी टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ऑनलाइन टास्कच्या आमिषाने फसवणूक – ऑनलाइन पद्धतीने घरातून कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका व्यक्तीची दोन लाख ८९ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत एका ५३ वर्षीय नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी शंकरशेठ रस्त्यावरील मीरा सोसायटीत राहतात. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून ऑनलाइन पद्धतीने काम करण्याची संधी असल्याचे आमिष दाखविले होते. चोरट्यांच्या खात्यात त्यांनी पैसे जमा केले. मात्र पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी कोणताही परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक भारमळ या प्रकरणाचा तपास करत आहेत.















