आवृत्ती पुणे
← Back to Homepage

म्हाडात सदनिका मिळवून देण्याच्या आमिषाने महिलेची फसवणूक

Spread the love

पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाकडून (म्हाडा) वितरित करण्यात येणारी सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखवून भामट्याने महिलेची १ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत रहाटणी येथील एका ३७ वर्षांच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून श्रीकृष्ण वसंतराव तौर उर्फ बाळाराजे पाटील (रा. अरणगाव, ता. परांडा, जि. धाराशिव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार कोंढव्यातील टिळकनगरमधील कोलते पाटील थ्री ज्वेल्सजवळील हॉटेलमध्ये २७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि तिच्या पतीची आरोपीशी ओळख झाली. आरोपीने महिला आणि तिच्या पतीला म्हाडात सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर आरोपीने महिला आणि तिच्या पतीला कोंढवा भागातील एका इमारतीजवळ बोलाविले. सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून १ लाख २० हजार रुपये घेतले.

पैसे घेतल्यानंतर महिलेने सदनिकेबाबत विचारणा केली. तेव्हा आरोपीने टाळाटाळ सुरू केली. त्यांना संशय आल्यावर त्यांनी आरोपीकडे पैसे परत मागितले. परंतु त्याने पैसे परत दिले नाहीत आणि म्हाडाचे घरही मिळवून दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक नेवसे तपास करीत आहेत.