एकमेकांकडे पाहण्यावरून झाली होती भांडणे : सिंहगड रोड पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कर्वेनगर येथे एकमेकांकडे पाहण्यावरून पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तिघा अल्पवयीन युवकांनी एका महाविद्यालयीन युवकावर तीक्ष्ण हत्याराने मानेवर, डोक्यावर व पाठीवर वार करून निर्घृण खून केला. सिंहगड रोड पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
करण गिरीश काशिद (वय १९, रा. धायरेश्वर मंदिराजवळ, धायरी गाव) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत श्रेयस संतोष आमले (वय १८, रा. अरविंद सोसायटी, आनंदनगर) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घटना आनंदनगर येथील सार्थक बंगला येथील सार्वजनिक रस्त्यावर सोमवारी, १६ मार्च रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण काशिद हा १२वीमध्ये शिक्षण घेत होता.
आरोपींपैकी दोघेजण १०वी व १२वीमध्ये शिकत आहेत. त्यांच्यामध्ये पूर्वी कर्वेनगर येथे एकमेकांकडे पाहण्यावरून भांडणे झाली होती. फिर्यादी, करण काशिद आणि त्यांचा मित्र समर दळवी हे गप्पा मारत उभे असताना तिघे हल्लेखोर तेथे आले.
त्यांनी काही समजण्याच्या आतच आपल्याकडील लोखंडी शस्त्राने करणवर हल्ला केला. त्याच्या डोक्यावर, मानेवर आणि पाठीवर सपासप वार केले. वर्मी घाव लागल्याने करण जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला.
हल्लेखोरांना त्याच्या मित्रांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फिर्यादी व त्यांचा मित्र समर दळवी यांच्यावर रस्त्यावरील दगड फेकून मारले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक समीर गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक आडगळे, समीर करपे आणि पोलीस उपनिरीक्षक भांडवलकर हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनाची माहिती घेतली.
पोलिसांनी रात्रीतून तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक समीर गायकवाड पुढील तपास करीत आहेत.















