आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अंमली पदार्थ मिश्रित पावडर बनविणाऱ्या कारखान्यावर छापा

Spread the love

पुणे : पान टपरीवर मिळणाऱ्या नशा आणणाऱ्या पानातील अंमली पदार्थ मिश्रित पावडर बनविणाऱ्या हिंजवडीतील कारखान्यावर अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला. अंमली पदार्थ विरोधी पथकाने येथून एका दाम्पत्याला अटक केली आहे. या कारखान्यातून ६ लाख ६३ हजार रुपयांची अंमली पदार्थ मिश्रित पावडर, काळ्या रंगाचा अंमली पदार्थ मिश्रित पातळ पदार्थ, ३ मोबाईल, एक कार असा माल जप्त केला आहे.

कैलास दत्तात्रय मांढरे (वय ५४) आणि अनुराधा कैलास मांढरे (वय ५४, दोघे रा. माळसाकांत चौक, आकुर्डी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यापूर्वी कदमवाक वस्ती येथील मैफिल पान हाऊस येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला होता.

या पान टपरीतून अँफेटामाइन, बेंझोडायझेपाइन्स, ओपिएट्स, मेथॅम्फेटामाइन या अंमली पदार्थांचे अंश मिश्रित असलेली भुकटी (पावडर) बाळगल्याबद्दल निशांत दत्तात्रय काळभोर (वय १९) आणि रामजी संतोष पटेल (वय ३३, रा. मैफिल पान हाऊस, कदमवाक वस्ती) यांना अटक केली होती.

फुलचंद पानामध्ये तंबाखू टाकून दिली जात असे. या नवीन ‘कडक फुलचंद’ पानामुळे गुंगी येत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यात गांजा मिसळत असावा, असे काहींना वाटत होते. तसेच त्यात अफूची पावडर करून टाकत असावेत, असे बोलले जात होते.

हे पान खाल्ल्यावर नशा येत असल्याने त्याला ‘कडक फुलचंद’ म्हटले जात होते. याची माहिती मिळाल्यानंतर कदमवाक वस्तीमधील मैफिल पान हाऊस येथे छापा टाकण्यात आला. त्यात पानामध्ये मिसळली जाणारी पावडर मिळाली.

अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे आता ‘ड्रग अ‍ॅनलायझर किट’ आले आहे. त्यावर चाचणी केली असता त्यात अँफेटामाइन, बेंझोडायझेपाइन्स, ओपिएट्स, मेथॅम्फेटामाइन हे चार अंमली पदार्थांचे अंश आढळले.

ही पावडर कोठे मिळते याचा तपास केला असता हिंजवडी परिसरातील जांभे गाव येथील चैतन्य फूड गोदामात ती तयार केली जात असल्याची माहिती मिळाली. कैलास मांढरे हा अंमली पदार्थ मिश्रित भुकटीचे उत्पादन व विक्री करत असल्याचे समजले. त्यानुसार हिंजवडी पोलिसांच्या सहकार्याने चैतन्य फूड गोदामावर छापा घालण्यात आला. तेव्हा तेथे सुपारी, कात यांच्यासह अंमली पदार्थांचे अंश असलेली पावडर मिळाली.

कैलास मांढरे हा या पावडरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करत असल्याचे दिसून आले. या भुकटीमध्ये अँफेटामाइन, बेंझोडायझेपाइन्स, ओपिएट्स, मेथॅम्फेटामाइन हे पदार्थ आढळून आले आहेत. त्यांचे नमुने रासायनिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आरोपींनी नशा येण्यासाठी अफूसारख्या अंमली पदार्थांचा वापर केल्याचे उघडकीस आले, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी दिली.

ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेणटवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक आणि पथकाने केली.

‘ड्रग अ‍ॅनलायझर किट’चा प्रथमच वापर
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात अंमली पदार्थांची विक्री तसेच तस्करी रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या कारवाईत अंमली पदार्थांची तपासणी तसेच विश्लेषण करण्यासाठी ‘ड्रग अ‍ॅनलायझर किट’चा पहिल्यांदाच वापर करण्यात आला आहे. — अमितेश कुमार, पोलीस आयुक्त