महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : माजी महापौर आणि आचार्य आनंदऋषीजी ब्लड बँकेचे संस्थापक शांतीलाल सुरतवाला (वय ७६) यांचे आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून रुबी हॉल क्लिनिकमध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातच आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ते होते. तसेच ते सुरेश कलमाडी यांचे खंदे पाठीराखे होते. सुरेश कलमाडी, अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्तातून सावरत असतानाच आता शांतीलाल सुरतवाला यांच्या निधनाचे वृत्त आल्याने पुण्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
शांतीलाल सुरतवाला यांचा राजकीय प्रवास १९७९ मध्ये सुरू झाला. सिटी पोस्ट वॉर्डातून त्यांनी पुणे महापालिकेची निवडणूक जिंकली. १९७९ ते २००७ अशी जवळपास २८ वर्षे ते नगरसेवक होते. १९९२ ते १९९३ या कालावधीत ते पुण्याचे महापौर होते.
महापौरपदाच्या काळात त्यांनी अनेक अभिनव कल्पना राबविण्याचा प्रयत्न केला. कात्रज तलावातील पाण्याने प्रमुख रस्ते धुऊन प्रदूषण कमी करण्याची त्यांची योजना खूप गाजली होती; मात्र प्रशासकीय पातळीवर त्यांना प्रतिसाद मिळू शकला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. सक्रिय राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले. आचार्य आनंदऋषीजी ब्लड बँकेची त्यांनी स्थापना केली. शहरातील अत्याधुनिक रक्तपेढी म्हणून ती ओळखली जाते.
गेल्या काही वर्षांमध्ये ते गिर्यारोहकांना मार्गदर्शनाचे काम करत होते. त्यांनी मानसरोवर यात्रा केली होती व मानसरोवर यात्रेसाठी ते मार्गदर्शन करत असत. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्याबरोबरच ते एक यशस्वी व्यापारीही होते. शुक्रवार पेठेत श्रीनाथ टॉकीज शेजारी त्यांचे पिढीजात किराणा दुकान आहे. तसेच ते तंबाखूचे व्यापारी होते.















