जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रियकराला लक्ष्मीनगर पोलिसांकडून अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : लग्न ठरल्यामुळे तरुणीने प्रेमसंबंध तोडल्याचा राग मनात धरून तिच्या प्रियकराने तिला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित तरुणाने तरुणीच्या होणाऱ्या पती व त्याच्या नातेवाईकांना प्रेमसंबंधांतील फोटो पाठवून तिचे लग्न मोडले. या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.
इम्रान रहिमान शेख (वय २२, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २१ वर्षांच्या तरुणीने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३० व ३१ जानेवारी २०२६ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी व इम्रान शेख यांच्यात गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र तरुणीचे लग्न ठरल्याने तिने इम्रान शेख याला यापुढे कोणताही संपर्क ठेवू नको, असे स्पष्ट सांगितले.
याचा राग धरून आरोपीने चार वर्षांच्या प्रेमसंबंधांचा गैरफायदा घेत अश्लील भाषेत बोलून ‘तुझे लग्न होऊ देणार नाही,’ अशी धमकी दिली. तसेच आरोपीने फिर्यादीच्या आईला लोखंडी हत्यार दाखवून “तुमच्या चौघांपैकी एकाचा खून करीन,” अशी जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर आरोपीने तरुणीच्या होणाऱ्या पती व त्यांच्या नातेवाईकांना तिच्याबरोबरचे प्रेमसंबंधांचे फोटो दाखवून तिचे लग्न मोडले. या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी इम्रान शेख याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक जगताप पुढील तपास करत आहेत.
















