महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : १४ फेब्रुवारी रोजी लोकमान्य टिळक सभागृह , पुणे येथे पार पडलेल्या Abacus Academy क्षेत्राच्या राज्यस्तरीय स्पर्धेत बार्शी येथील जयश्री अबॅकसच्या चार विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत राज्यभरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. स्पर्धेनंतर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मानचिन्ह, प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत स्वरा वखारिया हिने सर्वोत्तम विद्यार्थी तसेच उत्कृष्ट हस्ताक्षर ही दोन्ही पारितोषिके पटकावून विशेष कौतुक मिळवले. पवन सरकाळे याने प्रथम क्रमांक मिळवून बार्शीचे नाव उज्ज्वल केले. तर आरोही लढ्ढा आणि कृष्णा देवकर यांना द्वितीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पालक, शिक्षक व मार्गदर्शकांनी त्यांचे अभिनंदन केले. अबॅकस शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची गणिती क्षमता, एकाग्रता, स्मरणशक्ती व आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत होते. लहान वयातच मानसिक गणिताची सवय लागल्याने शालेय अभ्यासातही त्यांना चांगले यश मिळते.
त्यामुळे अशा स्पर्धांमधील सहभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा ठरतो. “आम्ही गेली १५ वर्षे अबॅकसचे वर्ग घेत आहोत आणि ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना यशस्वी मार्गदर्शन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि सातत्यपूर्ण सराव हेच मुख्य कारण आहे,” असे अनिता राजेंद्र कथले यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे बार्शी शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली असून, पुढील स्पर्धांसाठीही अधिक जोमाने तयारी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
















