धायरीतील घटना : प्रेमसंबंधाबाबत जाब विचारल्याचे कारण, संशयित आरोपी फरार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : प्रेमसंबंधाबाबत जाब विचारून पुन्हा अल्पवयीन मुलीला त्रास देऊ नको, असे सांगितल्याच्या कारणावरून तरुणाला लाकडी बॅटने मारहाण करून त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयित आरोपी फरार झाला आहे.
विशाल प्रशांत हबीब (वय २८, रा. राधिका रॉयल सोसायटी, बारंगणीमळा, धायरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचा भाऊ प्रथमेश प्रशांत हबीब (वय २६, रा. धायरी) यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी आदित्य उमाप याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना धायरीतील डीएसके रोडवरील दळवी वाडी फाट्याजवळ ११ मार्च रोजी रात्री दहा वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल हबीब यांचा सदाशिव पेठेतील बिजी लँड बिल्डिंगमध्ये टेलरिंगचा व्यवसाय आहे.
तो घरातून सकाळी १० वाजता निघून रात्री १० वाजता मोटारसायकलवरून परत घरी येत असे. १५ दिवसांपूर्वी त्यांच्या मामींचा फोन विशालला व त्याचे वडील प्रशांत हबीब यांना आला होता. त्यांच्या १६ वर्षांच्या मुलीला आदित्य उमाप हा त्रास देत असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याला एकदा समजून सांगा, असे मामींनी सांगितल्याने विशालने त्यांच्याकडून आदित्यचा मोबाईल नंबर घेतला होता.
आठवडाभरापूर्वी विशालने आदित्यला फोन करून, “तू पुन्हा माझ्या भाचीला त्रास देऊ नको,” असे सांगितले होते. त्यावेळी आदित्य आणि विशाल यांच्यात फोनवर बाचाबाची झाली होती. ११ मार्च रोजी नेहमीप्रमाणे विशाल सकाळी कामाला गेला होता. रात्री दहा वाजून गेले तरी तो घरी न आल्याने त्याच्या आईने मोबाईलवर फोन केला.
तेव्हा तो मोबाईल एका पोलिसाने उचलला आणि हा नंबर कोणाचा आहे, तुमच्या मुलाला अपघात झाला असून त्याला सिंहगड हॉस्पिटल येथे उपचारासाठी आणले आहे, असे सांगितले. विशालच्या तोंडावर जोरात मार लागल्याने त्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
विशालचा भाऊ प्रथमेश हबीब घटनास्थळी जाऊन पाहिल्यावर विशालची मोटारसायकल तेथे उभी असल्याचे दिसले. तिच्या खाली रक्त सांडलेले होते. तसेच लाकडी बॅटचे तुकडेही तेथे पडलेले दिसले.
हे पाहता, प्रेमसंबंधाबाबत जाब विचारल्याच्या कारणावरून आदित्य उमाप याने मारहाण करून विशाल हबीब याचा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. नांदेड सिटी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आदित्य उमाप याचा शोध सुरू आहे.















