सायबर सुरक्षेबाबत जनजागृतीसह विद्यार्थ्यांना एथिकल हॅकिंगचे मार्गदर्शन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंट येथे आयोजित ‘सूर्यभारत महा हॅकफेस्ट 2026’ या दोन दिवसीय उपक्रमातून विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, डिजिटल जागरूकता आणि नव्या तंत्रज्ञानाबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंट येथे ‘सूर्यभारत महा हॅकफेस्ट 2026’ उत्साहात पार पडला. सायबर सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांना सध्याच्या सायबर कायदे व डिजिटल सुरक्षेविषयी माहिती देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
एमसीए, बीसीए आणि बी.एस्सी. अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलनाने झाली. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, सुषमा संजय चोरडिया, स्नेहल नवलखा, डॉ. पराग काळकर, डॉ. आदित्य अभ्यंकर, डॉ. सुदिन बाराओकर, डॉ. मनीषा कुंभार, डॉ. प्रतीक्षा वाबळे, अरिंदम पॉल, नेहा देशपांडे आणि श्रुती ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनानंतर ARIKA Consultancy Pvt. Ltd. चे व्यवस्थापकीय संचालक अरिंदम पॉल यांनी डिजिटल युगातील सायबर जागरूकतेचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी ऑनलाईन फसवणूक, डेटा गोपनीयता, फिशिंग आणि ओळख चोरी यांसारख्या सायबर धोक्यांपासून बचाव करण्याचे उपाय उदाहरणांसह सांगितले.
सायबर सुरक्षा तज्ज्ञ नेहा देशपांडे यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक सत्र घेतले. त्यांनी काली लिनक्स, गुगल क्रोम आणि टॉर ब्राउझर यांसारख्या साधनांचा जबाबदारीने वापर करून सायबर हल्ल्यांपासून संरक्षण कसे करता येते, हे समजावून सांगितले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पराग काळकर, डॉ. आदित्य अभ्यंकर आणि डॉ. सुदिन बाराओकर उपस्थित होते. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना ‘सूर्यभारत एड्युटेक एक्सलन्स अवॉर्ड 2026’ प्रदान करण्यात आला.
डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी “डेटा हेच खरे सामर्थ्य आहे” असे सांगत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जनरेटिव्ह एआयच्या वाढत्या प्रभावावर प्रकाश टाकला. डॉ. सुदिन बाराओकर यांनी “नेक्स्ट जेन – एआय ऑटोनॉमिक वर्ल्ड्स” या विषयावर व्याख्यान देत एआयच्या प्रगतीचा आढावा मांडला.
कार्यक्रमादरम्यान हॅकफेस्ट स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना तज्ज्ञांशी संवाद साधण्याची आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.
दोन दिवसीय या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल नवोन्मेष क्षेत्रातील भविष्यातील संधींबाबत मार्गदर्शन मिळाले, तसेच त्यांच्या कौशल्यांना नवी दिशा मिळाली.
सायबर सुरक्षा आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान आजच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक आहे. अशा हॅकफेस्टमुळे विद्यार्थ्यांची तांत्रिक क्षमता, समस्या सोडविण्याची कौशल्ये आणि नवोन्मेषी विचारसरणी विकसित होते. – प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन















