पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे प्रायोजित “भावनिक बुद्धिमत्ता” या विषयावर आधारित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, आकुर्डी, पुणे येथे संपन्न झाले.
परिषदेच्या उद्घाटन समारंभासाठी नांदेड येथील प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ व समुपदेशक डॉ. नंदू मुलमुले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणातून भावनिक बुद्धिमत्तेचे वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक जीवनातील महत्त्व अधोरेखित केले.
या परिषदेमध्ये डॉ. सुमिता सातारकर, डॉ. नीता गाडे, डॉ. उन्नती कोळी, डॉ. प्राजक्ता कुलकर्णी, डॉ. तन्वी नाईक, डॉ. नीकिता भगवानी, डॉ. गीता होनराव, श्रुती सेठ आणि डॉ. मिनल सोहनी इत्यादी नामवंत तज्ञांनी उपस्थितांना भावनिक बुद्धिमत्तेचे महत्त्व, दैनंदिन जीवन व व्यावसायिक क्षेत्रातील त्याचा प्रभाव तसेच तणावपूर्ण परिस्थितीत भावनिक संतुलन कसे राखावे याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी संबंधित विषयावर पोस्टर सादरीकरण स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेतील विजेत्यांना समारोप समारंभात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सध्याच्या काळात अत्यंत महत्त्वाच्या या विषयावर परिषद आयोजित केल्याबद्दल डॉ. प्रमोद पाटील यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांचे विशेष कौतुक केले. या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक डॉ. शिल्पा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सारिका निकम व डॉ. प्रियतमा पोवार यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी श्रीकांत नाईक आणि श्रेयशी देशमुख यांनी केले. ही परिषद यशस्वीपणे संपन्न झाल्याबद्दल संकुल संचालक रिअर ॲडमिरल अमित विक्रम (नि) आणि विश्वस्त श्री तेजस पाटील यांनी सर्व आयोजक व सहभागींचे अभिनंदन केले.
















