अलंकार पोलिसांनी वाराणसी पोलिसांच्या मदतीने केली अटक : ६ लाखांचा माल जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : तेलंगणा, आंध्र प्रदेशसह महाराष्ट्रात ५० हून अधिक घरफोड्या करणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकाला अलंकार पोलिसांनी वाराणसी पोलिसांच्या मदतीने जेरबंद केले.
मोहम्मद बशर नूर मोहम्मद (वय ३८, रा. साऊथ डोनिया, काडोमटोली, डोनिया, ढाका, बांगलादेश, ऊर्फ नेवानाथ विनोद कुमार, रा. व्यंकटपूर, बालाजीनगर, रंगारेड्डी, तेलंगणा) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी कॅमेरा, लेन्स, एक ड्रोन, आयफोन व इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असा ६ लाख रुपयांचा माल जप्त केला.
तसेच त्याच्याकडून बांगलादेशी पासपोर्ट, अमेरिकन डॉलर, चिनी मुद्रा, मलेशियन, सिंगापूर, कॅनडियन व नेपाळी चलनही मिळाले आहे. कर्वेनगरमधील नवसह्याद्री सोसायटी येथील ‘द टेरिटरी’ या कार्यालयाच्या खिडकीचा बार तोडून आतील सोनी कंपनीचा कॅमेरा, दोन लेन्स, ड्रोन, आयफोन व इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असा ६ लाख ७१ हजार ५०० रुपयांचा माल चोरीला गेला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये एक जण रॉयल एनफिल्ड कंपनीची हिमालयन मॉडेल असलेली बुलेट घटनास्थळावरून चालवत नेताना दिसला. या वाहनाचा शोध घेतला असता तो हैदराबाद, चंद्रपूर, नागपूर, जबलपूर, लालबर्रा, शहडोल (मध्य प्रदेश), मिर्झापूर या मार्गे जात असल्याचे आढळले.
अलंकार पोलिसांनी वाराणसी पोलिसांच्या मदतीने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. वाराणसीतील रामनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत ३६ गुन्हे दाखल आहेत.
त्यापैकी २९ गुन्ह्यांत तो अटक झाला होता, तर ६ गुन्ह्यांत पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याच्याकडे बांगलादेशी पासपोर्ट व विविध देशांचे परदेशी चलन मिळाल्याने त्याचा दहशतवादी कारवायांशी संबंध आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.
न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित, महेश निंबाळकर, जगन्नाथ भोसले तसेच पोलीस अंमलदार जगदीश तळोले, निशिकांत सावंत, धीरज पवार, चांदगुडे, सोमेश्वर यादव व महिला पोलीस अंमलदार कुंभार यांनी केली.
तरुणीच्या प्रेमात धर्मांतर – मोहम्मद बशर नूर मोहम्मद असे नाव सांगत असला तरी नेवानाथ विनोद कुमार हे त्याचे मूळ नाव आहे. तो हैदराबादचा रहिवासी असून बी.टेकच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. त्यावेळी चोरीच्या आरोपात त्याला अटक झाली होती. घरच्यांनी जामीन न दिल्याने तो एक वर्ष कारागृहात राहिला आणि त्याचे शिक्षण अर्धवट राहिले. एका सलूनमध्ये जात असताना तेथील बांगलादेशी तरुणीच्या प्रेमात तो पडला. मात्र, चोरी करण्याची सवय कायम राहिली. त्यातून तो सुमारे अडीच वर्षे कारागृहात होता. सुटल्यानंतर तो त्या तरुणीसोबत नेपाळला गेला. तेथे बनावट कागदपत्रे तयार करून तो बांगलादेशात गेला आणि तेथे ९ वर्षे राहिला. तो चांगला शेफ असल्याने फ्रान्स, जर्मनी, इटली, ढाका आदी ठिकाणी काम करत होता. सुमारे महिनाभरापूर्वी तो नेपाळमार्गे उत्तर प्रदेशात आला. संतोष नावाच्या ओळखीच्या व्यक्तीच्या नावावर त्याने हिमालयन मॉडेलची बुलेट खरेदी केली. त्यानंतर तो पुण्यात आला व कर्वेनगर येथे घरफोडी केली. त्यानंतर तो तेलंगणात जाऊन पुढे वाराणसीला गेला. बुलेटचा वापर करत असल्याने तो अलंकार पोलिसांच्या नजरेत आला आणि अखेर पकडला गेला.




















