२३४ मॉडिफाईड सायलेन्सर, ८५२ वाहने जप्त : ५१ लाखांचा दंड
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वाहतूक पोलिसांनी २७ ते २९ मार्च या तीन दिवसांत संपूर्ण शहरात ट्रिपल सीट वाहनचालक, मॉडिफाईड सायलेन्सर असलेल्या बुलेट मोटारसायकली आणि ड्रंक अँड ड्राईव्हविरोधात विशेष मोहीम राबवली. त्यात १२६५ ट्रिपल सीट चालकांवर कारवाई करण्यात आली. मॉडिफाईड बुलेट सायलेन्सर असलेल्या ३२० बुलेटवर कारवाई करून त्यांचे मॉडिफाईड सायलेन्सर काढून जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांनी तीन दिवस राबविलेल्या या मोहिमेत एकूण ५ लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान एकूण २३४ मॉडिफाईड सायलेन्सर आणि ८५२ वाहने जप्त करण्यात आली आहेत. ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत शहरात वेगवेगळ्या ३० ठिकाणी नाकाबंदी पॉईंट लावण्यात आले होते.
या नाकाबंदीत दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या १८६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवरदेखील कारवाई करण्यात आली. विविध नियमभंग प्रकरणांतून तीन दिवसांत एकूण ५१ लाख ५४ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी सांगितले की, मॉडिफाईड सायलेन्सरचा वापर केल्याने ध्वनीप्रदूषण वाढून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. वाहनचालकांनी नियमांचे पालन करून सुरक्षित व शांततामय वाहतूक व्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे.
मद्यपान करून वाहन चालविणे हा गंभीर व दंडनीय गुन्हा असून स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालू नये. दुचाकी वाहनांवर ट्रिपल सीटने प्रवास करणे हे कायद्याने दंडनीय उल्लंघन आहे. ट्रिपल सीट प्रवासामुळे अपघाताची शक्यता वाढते व स्वतःसह इतर रस्ते वापरणाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो.
सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



















