४० टक्के परताव्याचे दाखविले होते आमिष : पिता-पुत्रावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : रिअल इस्टेट व्यवसाय वाढविण्यासाठी ४० टक्के परताव्याचे आमिष दाखवून महिलेची ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. खडक पोलिसांनी पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत रतनदेवी कांतीलाल ओसवाल (वय ५४, रा. जयभवानी सोसायटी, भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अनिल कटारिया (वय ६०) व राहुल अनिल कटारिया (वय ३५, रा. प्रेशियस जेम सोसायटी, कोरेगाव पार्क) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार नोव्हेंबर २०२२ ते १३ एप्रिल २०२६ दरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रतनदेवी ओसवाल यांची एलआयसी एजंट दीपक शहा यांच्या मध्यस्थीने सुमारे ५ वर्षांपूर्वी अनिल कटारिया व त्यांचा मुलगा राहुल कटारिया यांच्याशी ओळख झाली.
त्यावेळी ते कोरेगाव पार्क येथे राहत होते. ते रिअल इस्टेटचा व्यवसाय करीत असल्याने त्यांची पैशांची उलाढाल मोठ्या प्रमाणात व चांगली होती. त्यांना अधूनमधून पैशांची गरज पडत असल्याने ते ओसवाल यांच्याकडून कधी कधी पैसे घेत असत. घेतलेले पैसे ते वेळेवर परत करत असल्याने त्यांच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता.
नोव्हेंबर २०२२ मध्ये कटारिया पिता-पुत्र त्यांच्या घरी आले. त्यांनी कुठेतरी जमीन खरेदी करायची असून त्यासाठी ४० लाख रुपयांची गरज असल्याचे सांगितले. ही रक्कम उसनी नको असून, “तुम्ही ४० लाख रुपये द्या, त्याबदल्यात मी दरमहा १ लाख ६० हजार रुपये देईन आणि जेव्हा तुम्हाला पैशांची गरज असेल, तेव्हा मूळ रक्कम परत करेन,”
असे त्यांनी सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ओसवाल यांनी शेअर मार्केटमधील गुंतवणूक काढून नोव्हेंबर व डिसेंबर २०२२ मध्ये एकूण ४० लाख रुपये दिले. करारनामा करण्याबाबत त्यांनी विचारले असता, “माझ्यावर विश्वास ठेवा,” असे सांगण्यात आले.
यानंतर ऑगस्ट २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सलग तीन महिने प्रत्येकी १ लाख ६० हजार रुपये देण्यात आले. त्यानंतर मात्र पैसे देण्यास टाळाटाळ सुरू झाली. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी ओसवाल यांना ४० लाख रुपयांचे तीन धनादेश दिले; मात्र ते बँकेत जमा केल्यावर त्यावरील सही न जुळल्याने धनादेश परत आले.
याबाबत विचारणा केल्यावर “असे होऊ शकत नाही” असे सांगून त्यांनी पुन्हा नवीन धनादेश देण्याचे सांगत टाळाटाळ केली. दरम्यान, त्यांनी कोरेगाव पार्क येथील घर सोडल्याचे समजले. ते केवळ सिग्नल अॅपच्या माध्यमातून संपर्क साधत होते. ओसवाल यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे समजल्यावर त्यांनी सुरेश चौधरी यांच्या मोबाईलवरून संपर्क साधून एका महिन्यात पैसे देण्याचे आश्वासन दिले.
मात्र, गेली चार वर्षे पैसे वापरूनही कटारिया पिता-पुत्रांनी रक्कम परत न केल्याने ओसवाल यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक तोंडे करीत आहेत.















