१४ कोटींची केली होती फसवणूक : आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सोने-चांदी घेऊन त्याबदल्यात नवीन दागिने बनवून देण्याचा वायदा करून शहरातील रविवार पेठेसह इतर ठिकाणच्या अनेक सराफ व्यावसायिकांची सुमारे १४ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघा व्यावसायिकांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
पंकज गौतमचंद जैन (वय ४८, रा. मनमोहन रेसिडेन्सी, शांतीनगर सोसायटीजवळ, कोंढवा-बिबवेवाडी रोड) आणि नेमीचंद विशनराज कोरीमुथा (वय ५९, रा. ओ-२३०१, गंगाधाम टॉवर्स, मार्केटयार्ड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सोने-चांदी घेऊन त्याबदल्यात दागिने बनवून देण्याचे आश्वासन करून कोरीमुथा व पंकज जैन यांनी काहींकडून ६० किलो चांदी, तर काहींकडून सोने व रोख रक्कम घेऊन सराफ व्यावसायिकांची फसवणूक केली होती. याबाबत बंडगार्डन येथील राठोड ज्वेलर्सचे संजय पुष्कराज राठोड (वय ५५, रा. सुजय गार्डन, मुकुंदनगर) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात २८ जानेवारी २०२६ रोजी फिर्याद दिली होती. त्यावरून पोलिसांनी अमन कोरीमुथा (वय २७, रा. शांतीनगर सोसायटी, महात्मा फुले पेठ) याला अटक केली होती. हा प्रकार २२ जानेवारी २०२६ रोजी बंडगार्डन रोडवरील राठोड ज्वेलर्स येथे घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय राठोड यांचे बंडगार्डन रोडवर राठोड ज्वेलर्स हे दुकान आहे. पंकज जैन व नेमीचंद कोरीमुथा हे नवकार ज्वेलर्स व श्री नवकार प्लस या ज्वेलर्सचे मालक आहेत. राठोड यांनी नवीन माल घेण्यासाठी त्यांना ६० किलो चांदी दिली होती. ते नवीन माल दोन ते तीन दिवसांत देणार होते. मात्र, त्यांनी दिलेल्या मुदतीनंतरही नवीन वस्तू बनवून दिल्या नाहीत. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यावरही संपर्क होऊ शकला नाही.
त्यानंतर त्यांनी इतर व्यावसायिक मित्रांकडे चौकशी केली. त्यावेळी हरी विजय बाळकृष्ण देवकर यांच्याकडून त्यांनी ९८ लाख रुपये घेतल्याचे समजले. तसेच उमेश दराडे यांना ५० किलो चांदी देण्याचा वायदा करून त्यांच्याकडून ४० लाख रुपये घेतल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राठोड यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिली.
कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण यांनी हा व्यवहार पाहणारा त्यांचा पुतण्या अमर कोरीमुथा याला अटक केली होती. त्याच्याकडून ६७६ किलो चांदी जप्त करण्यात आली होती.
आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा वर्ग – हा गुन्हा दाखल झाल्यानंतर या त्रिकुटाने अनेकांना फसवल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. त्यांनी रविवार पेठेतील अनेक सराफ व्यावसायिकांना फसविल्याचे उघड झाले. जवळपास १२ सराफांची सुमारे १४ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले. त्यानंतर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक जानराव यांच्याकडे तपास सोपविण्यात आला. पोलिसांनी चारी बाजूंनी नाकाबंदी केल्यानंतर पंकज जैन आणि नेमीचंद कोरीमुथा हे न्यायालयात शरण आले. पोलिसांनी त्यांना अटक केली असून न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.















