बंडगार्डन पोलिसांत तक्रार : आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : गंभीर गुन्ह्यातील आरोपीने ससून रुग्णालयातून पलायन केले आहे. आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केले आहे. या घटनेमुळे ससून रुग्णालयात एकच खळबळ उडाली असून, आरोपी पळून गेल्याने पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली आहे. हा प्रकार मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास घडला आहे.
किशोर आत्माराम शिरसाठ (वय- 30 रा. येरवडा) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. किशोर शिरसाठ याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. एका गुन्ह्यात त्याला पोलिसांनी अटक केली होती. तो आज ससून रूग्णालयात असताना त्याने पोलिसांची नजर चुकवून तो रुग्णालयातून पळून गेला. आरोपी पळून गेल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे.
ससून रुग्णालयातून आरोपीने पलायन केल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि इतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे. याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्याला ससून रूग्णालयाकडून कळविण्यात आले आहे. याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे.
