विमानतळ पोलिसांची कारवाई : डी.वाय.पाटील कॉलेजशेजारील टेकडीवर घेतले ताब्यात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मित्राला मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणांना चार जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने आणि सिमेंट ब्लॉकने प्राणघातक हल्ला केल्याची घटना पुण्यात घडली होती. ही घटना पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एसआरए बिल्डिंग येथे सोमवारी (दि.22) रात्री साडे अकराच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी 8 तासात आरोपींचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
सोहेल मुल्ला, सिद्धार्थ कांबळे (रा. मंगळवार पेठ), सिद्धार्थ रजपुत (वय-19 रा. बुधवार पेठ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, त्यांच्या विधीसंघर्षीत साथिदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी विनायक उर्फ भैय्या क्षिरसागर (वय-20 रा. एसआरए बिल्डींग, विमाननगर) याने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक क्षिरसागर याचा मित्र करण हेळकर याला आरोपी सोहेल याच्या वडिलांनी मारहाण केली होती. या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी क्षीरसागर याचा मित्र साईनाथ पाटोळे गेला होते. त्यावेळी आरोपी आणि पाटोळे यांच्यात बाचाबाची झाली होती. सोमवारी रात्री फिर्यादी आणि त्यांचे दोन मित्र फिरोज कुतुब खान व प्रतिक शिवाजी खंडागळे हे बिल्डींगच्या पार्कींगमध्ये रात्री साडे अकराच्या सुमारास पब्जी गेम खेळत बसले असताना आरोपींनी कोयत्यासारख्या धारदार हत्याराने व सिमेंटच्या ब्लॉकने तिघांना बेदम मारहाण करुन जखमी करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना आरोपी डी. वाय. पाटील कॉलेज शेजारी असलेल्या टेकडीजवळ लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून गुन्हा घडल्यापासून 8 तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव, पोलीस कर्मचारी अविनाश शेवाळे, गणेश साळुंखे, सचिन जाधव, रुपेश पिसाळ, हरुण पठाण, विनोद महाजन, गिरीष नाणेकर, अंकुश जोगदंडे, शिवाराज चव्हाण नाना कर्चे यांच्या पथकाने केली.














