पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते : ऑपरेशन परिवर्तनची यशस्वी वाटचाल सुरू
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यामध्ये अवैध दारू निर्मिती व विक्री बंद करण्यासाठी ऑपरेशन परिवर्तन उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत हातभट्टी दारू व्यवसाय करणाऱ्यांचे समुपदेशन, पुनर्वसन व जनजागृती करण्याचे काम केले जाणार आहे. त्याचबरोबर गुन्हे दाखलही केले जाणार आहेत, असे सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. मुळेगाव तांडा (जि. सोलापूर) हे गाव सातपुते यांनी दत्तक घेतले आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समन्वयातून जिल्हा उद्योग केंद्र सोलापूर व मिटकॉन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांना फॅशन डिझायनिंग व शिलाई मशीनचे प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शविली. त्या अनुषंगाने २६ नोव्हेंबर २०२१ रोजी तांडा येथे ३० महिलांच्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले.
सातपुते म्हणाल्या की, कोणताही बदल घडवायचा असेल तर नारीशक्तीचा सहभाग आणि पाठिंबा असणे अत्यंत गरजेचे असते. मुळेगाव तांडा येथील दारूबंद करण्यासाठी तांड्यातील महिला पुढे आल्या आणि त्यांनी कायदेशीर व्यवसाय सुरू करण्याचे सीमोल्लंघन केले. दरम्यान, मुळेगाव तांडा येथील महिलांचे बी.एस.सी., बी.ए. पर्यंत शिक्षण झाले असून, त्यांना दारुबंदी व्यवसाय सोडून कायदेशीर व्यवसाय करावयाचा आहे. मुळेगाव तांडा या गावावरील हातभट्टी दारूचा ठपका पुसून टाकण्याचा मानस व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, ऑपरेशन परिवर्तनअंतर्गत मुळेगाव तांडा येथे पोलीस अधीक्षक सातपुते व त्यांच्या पथकाने वेळोवेळी छापा टाकून हातभट्टी दारू, रसायन व भट्टी साहित्य मिळून आल्याने गुन्हे दाखल केले. युवक व महिलांच्या बैठका घेऊन कायदेशीर व्यवसाय सुरू करण्याबाबत समुपदेशन केले. त्यामध्ये महिलांनी फॅशन डिझायनिंग व शिलाई मशीन ऑपरेटर ही कामे करण्यासाठी उत्सुकता दाखविली.
सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सोलापूर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते, यासीन यत्नाळ, मिटकॉनचे लोंढे, अभय दिवाण, विमानतळ प्राधिकरणाचे निचळ, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, अरुण फुगे, अतुल भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक वळसंग, निलकंठ जाधव आदी उपस्थित होते.














