सायबर पोलिसांत फिर्याद : महिलेला सायबर चोरट्यांनी घातला साडेपाच लाखांना गंडा
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : टीव्हीवरील जाहिराती पाहून फेसबुकवर गाद्या विक्री करण्याचा एका महिलेचा प्रयत्न चांगलाच अंगाशी आला आहे. सायबर चोरट्यांनी या गाद्या खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करुन त्यांची ५ लाख ४३ हजार ६१ रुपयांची फसवणूक केली. २२ ते २७ डिसेंबर २०२० दरम्यान ही घटना घडली होती.
मुंजाबावस्ती येथील एका ४८ वर्षाच्या महिलेने सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महिलेने फेसबुकवर गाद्या विक्रीची जाहिरात दिली होती. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून आपण लष्करात नोकरीस असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. या गाद्यांची खरेदीची रक्कम क्युआर कोडद्वारे पाठवित आहे, असे सांगितले. फिर्यादीस वेळोवेळी वेगवेगळे क्युआर कोड पाठवून त्याद्वारे पेमेंट प्रोसेस करावयास सांगून त्यांच्या खात्यातून ५ लाख ४३ हजार ६१ रुपये काढून घेऊन फसवणूक केली. गेल्या वर्षी २२ ते २७ डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या या घटनेची फिर्यादी यांनी आता तक्रार दिली असून, पोलीस निरीक्षक माळी तपास करीत आहेत.