पुण्यातील शिवाजीनगर गावठाणातील घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कस्टम अधिकारी असल्याचे सांगून स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून ८४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शिवाजीनगर गावठाण येथे फिर्यादीच्या घरी १३ सप्टेबर २०२० ते १६ जानेवारी २०२१ दरम्यान घडला.
विशाल दीपक गायकवाड (वय ३३, रा. पिंपळे गुरव) आणि माधवी किशोर ढेंभे ऊर्फ माधवी सुहास चव्हाण (पाटील) (वय ३०, रा. पनवेल, नवी मुंबई) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर गावठाण येथे राहणार्या एका ३५ वर्षाच्या तरुणाने फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल गायकवाड याच्याशी फिर्यादी यांची ओळख होती. गायकवाड याने माधवी ढेंभे या कस्टम अधिकारी असल्याचे सांगून फिर्यादीशी ओळख करुन दिली. त्या स्वस्तात सोने खरेदी करुन देतील, असे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादीकडून वेळोवेळी सोने खरेदीसाठी ७१ लाख ६० हजार रुपये रोख घेतले. तसेच अकाऊंटवरुन १२ लाख ४० हजार रुपये असे एकूण ८४ लाख रुपये घेतले. त्यांना कोणतेही सोने दिले नाही. सोने मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी आपले पैसे परत मागितले. परंतु, त्यांनी पैसेही न दिल्याने शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर तपास करीत आहेत.