लुबाडण्याच्या घटनांत वाढ : रिक्षाचालक, कामगार, ज्येष्ठ महिला, तरुण केले जाते लक्ष्य
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात रात्रीअपरात्रीच काय भर दिवसा रस्त्यावरुन फिरणे आता अवघड झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. रिक्षाचालक, कामगार, ज्येष्ठ महिला आणि तरुणांना भर रस्त्यात अडवून त्यांना लुटल्याच्या ५ जबरी चोरीच्या घटना रविवारी नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत रिक्षाचालक राजेश सोनाजी साबळे (वय ४९, रा. येरवडा) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साबळे २६ नोव्हेबरला सायंकाळी ७ वाजता पाटील इस्टेट येथे प्रवाशांच्या प्रतिक्षेत थांबले होते. तेव्हा एक अनोळखी व्यक्ती रिक्षात बसली. त्यांना रिक्षा फुलेनगर येथे घेण्यास सांगितले. रिक्षा तेथे गेल्यावर त्यांना लोखंडी सळईने मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाईल, रोख १६०० रुपये असा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर त्यांना रिक्षात मागे बसायला सांगून स्वत: रिक्षा चालविली. काही अंतर गेल्यावर त्यांना रिक्षातून ढकलून देऊन रिक्षाही चोरुन नेली.
खराडी येथील ६२ वर्षाच्या ज्येष्ठ महिला रविवारी दुपारी २ वाजता चंदननगर भाजी मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर हातगाडीवर ज्युस पित थांबल्या होत्या. यावेळी मोटारसायकलवरुन आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ६५ हजार रुपयांचे १९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून नेले. यावेळी त्यांनी केलेल्या आरडाओरडामुळे मोटारसायकलवरील चोरट्याला पोलिसांनी पकडले. तेजस भालचंद्र मोकाशी (वय ३०, रा. दत्तवाडी) असे या चोरट्याचे नाव आहे.
राकेश राजभर हे त्यांच्या मित्रासमवे पेंटींगचे काम संपवून शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता घरी जात होते. त्यावेळी आकाश अर्जुन दांगडे (रा. आकाशनगर, वारजे) हा त्यांच्या मागोमाग आला. तो पैशांची मागणी करु लागला. तेव्हा राजभर यांनी नकार दिला. त्याने जबरदस्तीने त्यांच्या पॅन्टच्या खिशातील पाकीट काढून घेतले व त्यातील १ हजार रुपये व २ हजार रुपयांचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. त्यांचा मित्र जितेंद्र राजबहर याच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीने काढून घेऊन पळून गेला.
















