अलंकार पोलिसांत गुन्हा दाखल : कंपनीतून बेकायदेशीरपणे पैसे काढून देण्यास विरोध
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कंपनीत बेकायदेशीररित्या प्रवेश करुन कंपनी व्यवहारातील बेकायदेशीररित्या पैसे काढून, सतत पैशांची मागणी करुन ते न दिल्याने कंपनी मालकाची बहिण व त्यांचे ज्येष्ठ नागरिक असलेल्या आई वडिलांनी महिलेची सोशल मीडियावर बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
अलंकार पोलिसांनी कंपनी मालकाची ३९ वर्षांची बहिण, ६३ वर्षांची आई आणि ७२ वर्षाच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी व्ही सॉल्व कंपनी (नळस्टॉप चौक) मध्ये काम करणाऱ्या एका महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १ सप्टेंबर २००९ ते १९ नोव्हेबर २०२१ दरम्यानच्या कालावधीत घडला आहे. फिर्यादी या व्ही सॉल्व्ह कंपनीत नोकरीवर आहेत. त्या कंपनीचे आर्थिक व्यवहार सांभाळत असताना कंपनीचे मालकांची बहिण, त्यांची आई व वडिल हे कंपनीत बेकायदेशीर प्रवेश करुन, कंपनीतून व्यवहारातील बेकादेशीररित्या पैसे काढत. सतत पैशांची मागणी करत. पैसे देत नसल्याने कंपनीत फिर्यादी यांची बदनामी करुन फिर्यादींचा विनयभंग होईल अशा प्रकारे अश्लील वर्तन करत. फिर्यादी या कंपनीतील पैसे काढून देत नसल्याने या तिघांनी फिर्यादी यांना वारंवार धमकावून शिवीगाळ केली.
मालकाच्या बहिणीने सोशल मिडियाचा वापर करुन फिर्यादीची अश्लील भाषेत संदेश प्रसारित करुन बदनामी केली. या प्रकाराने त्रस्त झालेल्या या महिलेने शेवटी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीखक प्रतिभा जोशी अधिक तपास करीत आहेत.















