न्यायालयाने ठोठावली सहा दिवस कोठडी : युवतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : सोळा वर्षाच्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवून तिचा गर्भपात करणाऱ्यास भाग पाडणाऱ्या प्रियकर आणि डॉक्टरला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी युवतीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली.
अमित अबदेश यादव (वय 18, रा. निरामय हॉस्पिटलजवळ, वडगावशेरी) त्याचा साथिदार धनंजय नामदेव रोकडे (वय ३८, रा. वडगावशेरी, गावठाण, पुणे) आणि गर्भपात करणारा डॉ. अनिल बाळकृष्ण वरपे (वय ५९, रा. वडगाव शेरी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वडगावशेरी येथील एका सोसायटीच्या शेजारील अर्धवट बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये हा गंभीर प्रकार घडला आहे.
पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलगी व तिचा प्रियकर यांच्यामध्ये मागील दोन वर्षापासून प्रेमसंबंध आहेत. तिचा प्रियकर अमित याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यातून युवती गर्भवती राहिली. त्यामुळे अमित याने मुलीला गर्भापत करायला लावला होता. दरम्यान धनंजय रोकडे याने देखील युवतीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तिच्याच प्रियकराने त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ तयार करुन समाजमाध्यमांमध्ये पाठवला.
पीडित युवतीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर 27 नोव्हेंबर रोजी दोघांना अटक करण्यात आली. त्यांना सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान याच गुन्ह्यात युवतीचा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला. डॉक्टरला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे विजयसिंह चौहान करीत आहेत.
