हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : दोन महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : नवविवाहित महिलेने हॉटेलच्या खोलीत ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक (ता. हवेली) येथील एका हॉटेलमध्ये घडली आहे.
रंगोली भास्कर वडावराव (वय ३२, रा. सर्व्हे नं.५१, धानोरी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. हवेली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, रंगोली वडावराव ही महिला दुपारी दोनच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथील हॉटेलमध्ये एक दिवसाकरीता राहावयास आली होती. सायंकाळी वेटरने दरवाजा वाजवला असता आतून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने हॉटेल चालकाने पोलिसांना कळवले. रात्री पोलीस आल्यानंतर दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला. त्यावेळी महिलेने गळफास घेतल्याचे दिसून आले.
दोनच महिन्यापूर्वी झाला होता विवाह…
रंगोली वडावराव या पहिल्या पतीपासून विभक्त झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी दोन महिन्यापूर्वीच दुसऱ्या व्यक्तीबरोबर लग्न केले होते. त्यांना पहिल्या पतीपासून सात वर्षाचा एक मुलगा आहे. कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.















