येरवड्यातील लक्ष्मीनगरमधील घटना : पुण्यात तडीपार गुंडाचा हैदोस
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : तडीपार केले असताना राजरोजपणे घरी राहून शेजारी राहणार्यांना शिवीगाळ करुन त्यांच्या वर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तडीपार गुंड व त्याच्या भावावर येरवडा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
तडीपार गुंड सचिन अडगळे (वय ३२) आणि त्याचा भाऊ नवनाथ अडागळे (वय ३५, रा. लक्ष्मीनगर येरवडा) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अब्दुलशकुर शौकत उस्ताद (वय २६, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, उस्ताद व अडागळे हे शेजारी शेजारी रहातात. सचिन अडागळे याला पोलिसांनी तडीपार केले असतानाही तो राजरोजपणे घरात रहात होता. २९ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सचिन अडागळे याने फिर्यादी यांच्या घरातील लोकांना विनाकारण शिवीगाळ केली. त्याबाबत फिर्यादी यांनी आरोपीकडे चौकशी केली असता सचिन याने घरातून कोयता आणून फिर्यादीच्या उजव्या हातावर, कानावर, डोक्यावर सपासप वार करुन जबर जखमी केले. त्याचा भाऊ नवनाथ अडागळे याने फिर्यादीचा भाऊ नियामत व आई यांना काठीने मारहाण केली. त्यामुळे ते सर्व जण भीतीने दरवाजा बंद करुन घरात लपून बसले. तेव्हा या दोघा भावांनी वस्तीमध्ये हातात कोयता व काठी घेऊन आरडाओरडा करुन दहशत निर्माण केली. त्यांच्या दहशतीमुळे वस्तीतील कोणीही त्या लोकांना वाचविण्याकरीता पुढे आले नाही. येरवडा पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.
