पोलीस अधिकारी-कर्मचारी जखमी : येरवडा पोलिसांचा स्वरक्षणार्थ हवेत गोळीबार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : घरात घुसून कुटुंबाला मारहाण करणार्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जमावाने हल्ला केला. त्याला पोलिसांनी अटक केले आहे. जमावाने केलेल्या हल्ल्यात एक पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाल्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणार्थ हवेत गोळीबार केला. ही घटना येरवडा येथील पोतेवस्ती येथे गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
शक्तीसिंह सुरजसिंग बावरी (वय २२) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, येरवडा येथील पोते वस्ती येथे सर्व धर्म समभाव सोसायटी ही म्हाडाची इमारत आहे. येथील नागरिकांना शक्तीसिंह सुरजसिंग बावरी (वय २२) हा गुन्हेगार व त्याचे साथीदार त्रास देत होते. गाड्यांमधील पेट्रोल चोरणे, घराचे दरवाजे खिडक्या फोडणे, टेरेसवर परवानगी न घेता जाऊन दारु पिणे, पत्ते खेळत बसणे असे प्रकार करुन सोसायटीत तो व त्याचे साथीदार गोंधळ घालत आले आहेत. त्यामुळे या सोसायटीतील २०० घरांपैकी १७९ फ्लॅटधारक सोसायटी सोडून दुसरीकडे राहत आहे. बुधवारी रात्री ख्रिश्चन समाजातील एका कुटुंबाच्या घरात शिरुन शक्तीसिंहने मारहाण केली होती. गस्तीवरील पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांना त्याची माहिती दिली.
पोलिसांनी तेथे जाऊन शक्तीसिंह याला हटकले. यावेळी त्याने आपल्या समाजातील लोकांना भडकाविले. लोकांचा मोठा जमाव तेथे जमला. त्यांनी पोलीस निरीक्षक गाडे व कर्मचार्यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. हे प्रकार पाहिल्यावर पोलिसांनी हवेत गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजाने जमाव पांगला. त्यानंतर पोलिसांनी अधिक कुमक मागवून शक्तीसिंह याला अटक केली आहे.
शक्तीसिंह याच्या टोळीची सर्वधर्म सोसायटी, अग्रसेन हायस्कूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, इंद्रप्रस्थ उद्यान, डेक्कन कॉलेज परिसरात दहशत होती. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले असून हे गुंड प्रवृत्तीचे लोक कोणाला ही घाबरत नाही. त्यामुळे यापुढेही पोलिसांनी अशीच कडक कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
