वानवडी पोलिसांत गुन्हा : अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यास खावी लागेल जेलची हवा
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : अल्पवयीन मुलांचे अश्लिल व्हीडिओ बनविणे, पाहणे, ते सोशल मीडियावर पोस्ट करणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे अल्पवयीन मुलांचे व्हीडिओ फेसबुकवर पोस्ट करणार्यास वानवडी पोलिसांनी अटक केली आहे.
सिद्धू गोलालाप्पा चांदकोटी (वय ३३, रा. रामटेकडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भूषण पोटवडे यांनी फिर्याद दिली आहे.
एनसीएमईसी या अमेरिकन सामाजिक संस्थेच्या तक्रारीवरुन सर्वोच्च न्यायालयाने चाइल्ड पोर्नोग्राफीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एनसीआरबी देशभरात चाइल्ड पोर्नोग्राफीवर नजर ठेवते. सोशल मीडियावर अल्पवयीन मुलांचे व्हिडिओ व्हायरल करणार्यांची माहिती स्थानिक पोलिसांना दिली जाते. त्यानुसार वानवडी पोलिसांना याची माहिती मिळाली होती. सिद्धु चांदकोटी याने १७ जून २०२० रोजी सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास आपल्या फेसबुक अकाऊंटवर लहान मुलांचा अश्लिल व्हिडिओ पोस्ट केला होता, म्हणून गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) साळगावकर पुढील तपास करत आहेत.