सोलापूर ग्रामीणच्या एलसीबीची धडाकेबाज कामगिरी : ११ लाख ३९ हजार ७५० रुपये किमतीचा साठा व वाहने जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
सोलापूर : गोदूताई नवीन विडी घरकुल कुंभारी येथे अवैध घरगुती गॅसचा काळा बाजार करणाऱ्या तिघांना अटक करून ११ लाख ३९ हजार ७५० रुपये किमतीचा साठा व वाहने जप्त केली. सोलापूर ग्रामीण एलसीबीच्या पथकाने धडाकेबाज कामगिरी केली.
मोहसीन अलिम शेख (वय ३०), वसिम सैफन शेख (वय ३४, दोघे रा. नवीन गोदुताई विडी घरकुल कुंभारी वळसंग) आणि राजशेखर ऊर्फ राजू पंडित कोळी (वय २९, रा. आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, गोदूताई नवीन विडी घरकुल कुंभारी येथे पत्राच्या शेडमध्ये घरगुती वापराचा गॅस विनापरवाना भरत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून ११ लाख ३९ हजार ७५० रुपये किमतीच्या ११ गॅसच्या भरलेल्या टाक्या, पाच रिकाम्या गॅसच्या टाक्या, इलेक्ट्रॉनिक मोटारसह एक ऑटो रिक्षा व एक टाटा अल्टो कंपनीची मालवाहतूक गाडी असे साहित्य जप्त केले. पुढील तपास अजय हंचाटे करीत आहेत.
सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी सोलापूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, सहायक फौजदार राजेश गायकवाड, ख्वाजा मुजावर, पोलीस अंमलदार प्रकाश कारटकर, परशुराम शिंदे, आबासाहेब मुंडे, समीर शेख यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.